पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनानागपूर : नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील मैदानावरील धावण्याच्या ट्रॅकवर विद्यार्थ्यांसह सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या अभ्यागतांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिल्यात.अमरावती रोडवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या खेळाच्या मैदानासह येथील सुविधांची माहिती पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी घेतली. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, माजी खासदार विलास मुत्तेमवार, महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, क्रीडा उपसंचालक रेवतकर, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या संचालक कल्पना जाधव, डॉ. माधवी मार्डीकर, डॉ. धनंजय वेळूकर आदी उपस्थित होते. विद्यापीठातर्फे ४०० मीटर लांबीच्या व आठ लेनचा सिंडर ट्रॅक खेळाडू व अभ्यागतांसाठी उपलब्ध करून दिला आहे. येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या अभ्यागतांना ट्रॅकवर आवश्यक सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगताना पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सिंडर ट्रॅक हा कोळशाच्या भुकटीपासून तयार करण्यात आल्यामुळे यावर नियमित पाणी टाकणे आवश्यक आहे. चालताना त्रास होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.विद्यापीठ परिसरातील सिंडर ट्रॅकसह विविध खेळासाठी तयार करण्यात आलेल्या मैदानावर खेळाडू तसेच इतर अभ्यागतांना या परिसरात आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे आवश्यक स्वच्छतागृह बांधण्यात येतील. विद्यापीठाने या परिसरात आवश्यक विद्युत व्यवस्था कायम ठेवावी, तसेच संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवतानाच मैदानाच्या सभोवताल वृक्षारोपण करावे आदी सूचनाही यावेळी त्यांनी दिल्यात.कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी विद्यापीठातर्फे खेळाडू व येथे मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्यांना आवश्यक सुधारणा तात्काळ करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे डॉ. धनंजय वेळूकर यांनी सिंडर ट्रॅक तसेच अॅथलेटसाठी आवश्यक सुधारणा करण्यासंदर्भात तात्काळ कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
विद्यापीठाच्या मैदानाचा ‘ट्रॅक’ सुधारा
By admin | Updated: April 4, 2017 02:02 IST