लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून कर आकारणी करण्याचे काम सायबरटेक कंपनीला दिले होते. परंतु कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचा सर्व्हे केला. एकाच घराचे तीन घर दर्शवून दुसरा इण्डेक्स क्रमांक देऊन कर आकारणी केली. यामुळे कर वसुलीत अडचणी येत असल्याने सर्व्हेतील चुका दुरुस्त करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रीय नागपूर काॅपोंरेशन एम्प्लाॅईज असोसिऐशनने मनपा आयुक्तांकडे केली आहे.
एका घराची अधिक घर दर्शविल्याने जादाचा कर आकारण्यात आला आहे. एकाच घराचे एकाहून अधिक इण्डेक्स क्रमांक दिल्याने मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविले आहेत. त्यांनी कर जमा केलेला नाही. दुसरीकडे कर थकबाकीची रक्कम मोठी दिसत आहे. चुकीच्या पद्धतीने आकारलेला कर वसूल होणे शक्य नसल्याने प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन सायबरटेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकांची दुरुस्ती करावी. तसेच कर आकारणी विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने या विभागात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस रंजन नलोडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.