नागपूर : आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या राजपत्रातील ‘सीसीआयएम’च्या अधिसूचनेविरुद्ध ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) शुक्रवारी बंद पुकारला होता. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ओपीडी व दवाखाने बंद ठेवण्यात आल्याने याचा फटका सामान्य रुग्णांना बसला. शहराबाहेरून आलेल्या रुग्णांना मेयो, मेडिकलचा आधार घ्यावा लागला.
‘आयएमए’च्या एकदिवसीय संपातून आकस्मिक सेवांना वगळण्यात आले होते. यामुळे अतिदक्षता विभाग सुरू होता. ‘आयएमए’च्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी व सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांनी जिल्ह्यातील सर्व सदस्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यामुळे आज बहुसंख्य खासगी दवाखाने बंद होते. आजाराच्या पाठपुराव्यासाठी आलेल्या रुग्णांना रिकाम्या हाताने परतावे लागले. काहींनी मेयो, मेडिकलमध्ये जाऊन उपचार घेतला. परंतु संप सायंकाळी ६ वाजेपर्यंतच होता. सायंकाळी ७ वाजतापासून अनेक खासगी हॉस्पिटलमधील ओपीडी सुरू झाल्या. काही कॉर्पाेरेट्स दवाखाने संपात सहभागी झाले नव्हते. यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली नव्हती.
-मेयोच्या निवासी डॉक्टरांचाही आंदोलनात सहभाग
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने या संपाला पाठिंबा देत रुग्णालयाच्या परिसरात आंदोलन केले. मार्डचे अध्यक्ष डॉ. गणेश पारवे यांच्या नेतृत्वात शांती मार्च काढण्यात आला. आयुर्वेद विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अॅलोपॅथीमधील शस्त्रक्रियांच्या परवानगीने रुग्णाच्या जीवाला कसा धोका होऊ शकतो, याची जनजागृतीपर माहिती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लोकांना देण्यात आली. आंदोलनात मार्डचे सचिव डॉ. आशिष केंद्रे, डॉ. अद्वैत मुळे, डॉ. समीर मानधने, डॉ. उज्ज्वला शिंदे, डॉ. सेठ्ठी यांच्यासह १५०वर निवासी डॉक्टर सहभागी झाले होते.
-आयुष डॉक्टरांनी गुलाब फीत लावून दिली सेवा
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारसंबंधी स्पष्टता देणारे राजपत्राला आयएमएने विरोध करीत आज संपाचे हत्यार उपसले असलेतरी, आयुष कृती समितीने या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी स्पष्टतेचे स्वागत करीत गुलाबी फीत लावून नियमित वैद्यकीय सेवा दिली. ‘निमा’ संघटनेचे महाराष्ट्राचे राज्य संघटक डॉ. मोहन येंडे यांच्या नेतृत्वात नागपुरात नि:शुल्क आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना धन्यवादाचे पत्र दिले जाईल, अशी माहितीही डॉ. येंडे यांनी ‘लोकमत’ला दिली.