मंगेश तलमले
लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : नागपूर जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला नाही; मात्र काही महत्त्वाच्या घाटांमधून रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. यात तांडा (ता. माैदा) शिवारातून वाहणाऱ्या सूर नदीचा समावेश आहे. या शिवारातील मुख्य मार्गावर रेतीचा साठा आढळून आला असून, महसूल प्रशासनाने त्याबाबत काेणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या वरदहस्तामुळे रेतीची चाेरी वाढली आहे, असा आराेप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
तांडा शिवारातून सूर नदी वाहते. अलीकडच्या काळात रेतीचाेरट्यांनी या नदीला लक्ष्य केले आहे. चाेरटे या नदीच्या पात्रातून राेज ४० ते ५० ट्रॅक्टर रेतीचा उपसा व उचल करून ती वाहून नेतात. रेतीचा उपसा व वाहतूक २४ तास सुरू असते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या घाटातून रेतीचा उपसा काेण करताे, याबाबत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना इत्यंभूत माहिती आहे. मात्र, कुणीही रेतीचाेरीला आळा घालण्यासाठी पुढाकार घेत नाही.
रेतीचाेरी पकडू नये म्हणून तीन दिवसांपूर्वी ट्रॅक्टरचालकाने ट्राॅलीतील रेती खात-तांडा-वायगाव राेडवर टाकून पळ काढला. महसूल विभागातील अधिकारी दिसल्याने आपण ती रेती राेडवर टाकल्याचेही चालकाने ट्रॅक्टर मालकास गावात आल्यावर सांगितले. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी त्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला नाही किंवा गावात येऊन ट्रॅक्टरच्या मालकास विचारपूस केली नाही. रेती चाेरट्यांची परिसरात दहशत निर्माण झाल्याने त्यांच्या विराेधात बाेलायला किंवा तक्रार द्यायला नागरिक तयार हाेत नाहीत.
काहींनी ती रेती राेडवर टाकताना प्रत्यक्ष बघितले; मात्र दहशतीमुळे कुणीही ट्रॅक्टरचालक व मालकाचे नाव सांगायला तयार नाही. या प्रकारामुळे रेतीच्या चाेरीत वाढ हाेत असून, शासनाचा लाखाे रुपयांचा महसूल बुडत आहे. दुसरीकडे, रेतीच्या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे रस्त्यांची दैनावस्था झाली असून अपघातही हाेत आहेत. आर्थिक हितसंबंधामुळे महसूल विभागातील कर्मचारी रेती चाेरट्यांवर कठाेर कारवाई करीत नाहीत, असा आराेप नागरिकांनी केला आहे.
....
वाहने घसरून अपघात
तीन दिवसांपूर्वी रेतीचा ट्रॅक्टर घाटातून बाहेर काढत खात-तांडा-वायगाव- या मुख्य मार्गावर आणला. ट्रॅक्टर चालकास महसूल विभागातील अधिकारी दिसताच त्याने लगेच ट्राॅलीचे पल्ले उघडे केले आणि ट्रॅक्टरचा वेग वाढवून पळ काढला. ही रेती सूर नदीवरील पुलाच्या परिसरात टाकण्यात आली असून, त्या ठिकाणी तांडा गावाच्या दिशेने राेडला उतार आहे. ती रेती संपूर्ण राेडवर पसरली असल्याने रेतीवरून दुचाकी व तीनचाकी वाहने घसरत असल्याने अपघातही हाेत आहेत.