लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी शनिवारी सकाळी कामठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन माेटारसायकली आणि दारू असा एकूण २ लाख ४ हजार ९८४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
लाॅकडाउनच्या पार्श्वभूमीवर कामठी शहरात अवैध दारूविक्रीला उधाण येत असल्याचा अनुभव असल्याने पाेलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध माेहीम सुरू केली. पाेलिसांनी एमएच-४०/बीक्यू-४७८३ क्रमांकाच्या माेटारसायकलने जात असलेल्या अभिषेक यशवंत रोडगे (वय २८, रा. नयानगर, राणी तलाव, कामठी) याला थांबवून झडती घेतली. त्याच्याकडील पाेत्यात देशी दारूच्या ४८ बाटल्या आढळून येताच पाेलिसांना त्याला अटक केली आणि त्याच्याकडून ६५ हजार रुपयांची माेटारसायकल व २४९६ रुपये किमतीची दारू असा एकूण ६७ हजार ४९६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, पाेलिसांनी एमएच-४० / एडब्ल्यू-८११७ क्रमांकाच्या माेटरसायकलने जाणाऱ्या उमेश पृथ्वीराज सुखदेवे (२२, रा. जयभीम चौक, कामठी) याची झडती घेतली. त्याच्याकडे देशी दारूच्या २० बाटल्या आढळून येताच त्याला अटक केली आणि त्याच्याकडून ८० हजार रुपयांची माेटारसायकल व २८०० रुपये किमतीची दारू असा एकूण ८२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढे पाेलिसांच्या पथकाने हातठेला घेऊन जात असलेल्या संजय श्रावण खडसे (४०, रा. अब्दुल्ला बाबा दर्गा, झोपडपट्टी, कामठी) याला जयस्तंभ चाैकात थांबवून झडती घेतली. त्याच्याकडील पाेत्यात देशी दारूच्या ४८ बाटल्या आढळून आल्याने पाेलिसांनी त्यालाही अटक केली. त्याच्याकडून दारू व हातठेला असा एकूण ३,५९६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पाेलिसांनी एमएच-४०/सी-३८८८ क्रमांकाच्या माेटारसायकलने जात असलेल्या विधिसंघर्षग्रस्त बालकास कामठी शहरातील जयस्तंभ चाैकात थांबवून त्याची घडती घेतली. त्याच्याकडेही देशी दारूच्या ४८ बाटल्या आढळून आल्याने त्यालाही पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४५ हजार रुपयांची माेटारसायकल व २,४९६ रुपयांची दारू असा एकूण ४७ हजार ४९६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सूर्यकांत दुर्वास मेश्राम (२३, रा. जयभीम चौक, कामठी) हा सायकलने जात असताना पाेलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत देशी दारूच्या बाटल्या आढळून येताच पाेलिसांनी त्याला अटक केली व त्याच्याकडून सायकल व दारू असा एकूण ३,५९६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या चारीही कारवायांमध्ये तीन माेटारसायकली, सायकल, हातठेला व दारूच्या बाटल्या असा एकूण २ लाख ४ हजार ९८४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी दुय्यम पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, राजेंद्र टाकळीकर, मंगेश यादव, पप्पू यादव, मंगेश लांजेवार, संदीप गुप्ता, उपेंद्र यादव यांच्या पथकाने केली.