मुख्यमंत्री, गडकरी यांची सूचना : विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देशनागपूर : ‘आयआयएम-नागपूर’ हे सर्व दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले पाहिजे. विशेषत: या संस्थेची कायमस्वरूपी इमारत ही सर्वोत्तम असली पाहिजे व याच्या बांधकामाचा आराखडा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘आर्किटेक्ट’कडून तयार व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केली. हैदराबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीत ‘आयआयएम’च्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. ‘आयआयएम-नागपूर’ला ‘व्हीएनआयटी’तील तात्पुरत्या इमारतीत सुरू होऊन वर्ष झाले आहे. कायमस्वरूपी इमारतीसाठी मिहानमधील मौजा दहेगाव येथील २०० एकर जागा प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी १४३ जागा राज्य शासनाने दिली आहे. या जागेवर इमारतीच्या उभारणीसंदर्भात जलदगतीने हालचाली व्हायला हव्या. इमारत उभी करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी, तसेच काही अडचणी आल्या तर तत्काळ कळविण्यासंदर्भात फडणवीस व गडकरी दोघांनीही सूचना केल्या. या बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.पी.एस.मीना, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘आयआयएम-नागपूर’ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे
By admin | Updated: July 4, 2016 02:26 IST