नागपूर : आदिवासींमध्ये कोणत्याही परिस्थितीत धनगरांचा समावेश होऊ देणार नाही आणि शासनाने हा निर्णय घेतलाच तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजबांधवांसोबत रस्त्यावर उतरेन अशी ग्वाही आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम यांनी दिली.आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन व नॅशनल आदिवासी पीपल्स, महिला, युवक, विद्यार्थी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मानकापूर येथील क्रीडा संकुलात ३६ वे एक दिवसीय महाधिवेशन आयोजित करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अन्य उपस्थित प्रमुख अतिथींमध्ये प्रामुख्याने आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार राजीव तोडसाम, आमदार संजय पुराम, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजे वासुदेवशहा टेकाम यांचा समावेश होता. नॅशनल आदिवासी पीपल्स, महिला, युवक, विद्यार्थी फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप मडावी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.आत्राम पुढे म्हणाले, जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना आदिवासी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी गैरव्यवहार करून बोगस वैधता प्रमाणपत्रे वितरित करीत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे वैधता प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. वडिलांकडे वैधता प्रमाणपत्र असल्यास मुलांना कोणत्याही कागदपत्राशिवाय वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यापुढे गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याचा निर्णय विचाराधीन आहे.या शासनाने आदिवासी समाजाच्या विकासाकरिता अर्थसंकल्पामध्ये नऊ टक्के निधीची तरतूद केली आहे. परिणामी आदिवासी समाजाला पाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. आदिवासींच्या योजनेतील भ्रष्टाचार थांबविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शासकीय योजनेच्या लाभापासून एकही आदिवासी वंचित रहायला नको. आदिवासी कोणापेक्षाही कमी नसून संधी मिळाल्यास ते सर्वांच्या पुढे निघून जातील, असा विश्वास व्यक्त करून नागपुरात सर्वांत मोठे आदिवासी समाज भवन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आत्राम यांनी दिले.सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका व पारंपरिक गीतांच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. मधुकर उईके यांनी प्रस्ताविक तर, सुधाकर मडावी यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)
आदिवासींमध्ये धनगरांना सामावल्यास रस्त्यावर उतरेन
By admin | Updated: April 27, 2015 02:26 IST