विद्यापीठाची महाविद्यालयांना सूचना : हिवाळी परीक्षांचे परीक्षा प्रवेशपत्र दोन आठवड्यांअगोदरच तयारनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला ५ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. प्रवेशपत्रांवरून मागील वेळी झालेला गोंधळ लक्षात घेता यंदा दोन आठवड्यांअगोदरच परीक्षा प्रवेशपत्र महाविद्यालयांच्या ‘लॉगिन’वर पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जर प्रवेशपत्रांबाबत काही तक्रारी असतील त्या अगोदरच विद्यापीठाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. वेळेवर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे विद्यापीठाने महाविद्यालयांना बजाविले आहे.हिवाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने बीएसस्सी, एमए, एलएलबी, एमबीए, एमसीए, एमकॉम या विषयांच्या पुरवणी परीक्षांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रमनिहाय परीक्षा केंद्रांची यादी जाहीर केली आहे. विद्यापीठाने परीक्षा अर्ज दाखल करणे तसेच परीक्षा प्रवेशपत्रे जारी करणे ही प्रक्रिया ‘आॅनलाईन’ केली आहे. महाविद्यालयांचा हलगर्जीपणा, विद्यापीठातील तांत्रिक चुका इत्यादी कारणांमुळे मागील दोन परीक्षांपासून सातत्याने ऐनवेळी परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांना धावाधाव करावी लागली होती. अनेक महाविद्यालयांकडून तर ऐनवेळी ‘आॅफलाईन’ परीक्षा अर्ज सादर करण्यात आले होते. याचा फटका पुढे निकालांनादेखील बसला व ‘डाटा’चा गोंधळ झाल्याने काही जणांचे निकाल अनुपस्थित असे आले होते.ही सर्व बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने यंदा अनेक महाविद्यालयांच्या ‘लॉगिन’वर विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रे अगोदरच पाठविली आहेत. काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे १ ते २ दिवसांत ‘आॅनलाईन’च उपलब्ध होतील.जर विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रात काही त्रुटी आढळल्या तर त्या महाविद्यालयांनी वेळीच विद्यापीठाला कळवाव्यात, असे परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांनी आवाहन केले आहे. परीक्षा प्रवेशपत्रे अगोदरच पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या अगोदर कुणी तक्रार घेऊन आले तर त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात येणार नाही. अशा परिस्थिती जर कुठला विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर त्याची जबाबदारी ही महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासनाची राहील, असेदेखील डॉ.खटी यांनी स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)
ऐनवेळी तक्रार आली तर दखल घेणार नाही
By admin | Updated: September 29, 2016 02:31 IST