- संजय नहार यांचे कौतिकरावांना प्रत्युत्तर
- तुमच्या विचारण्यातच नकार होता, हे स्पष्ट करा
प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ज्या प्रकारे कोरोनाची भीती व्यक्त करत आहेत, ते योग्य आहे. मात्र, या भयात विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो आहे. इतकीच धास्ती आहे तर मग मार्च महिन्यातच संमेलन घेण्याचा अट्टहास का, असे प्रत्युत्तर सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी दिले आहे.
कोरोनाच्या दीर्घ काळानंतर जानेवारीच्या पहिल्याच रविवारी पार पडलेल्या महामंडळाच्या बैठकीपूर्वी अध्यक्षांकरवी दुसऱ्याच कुणी सदस्याने दिल्लीत ३० मार्च २०२१च्या पूर्वी संमेलन घेऊ शकता का, असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात महामंडळ अध्यक्षांना कोरोनाची जी भीती आहे, तीच व्यक्त करत १ मे ही तारीख स्पष्ट केली होती. मात्र, त्यांचे नाशिक हे आधीच निश्चित झाले होते, हे त्या नंतरच्या घडामोडीवरून स्पष्ट व्हायला लागले आहे.
दिल्लीमध्ये संमेलन घेण्यामागची भूमिका महाराष्ट्राबाहेर असलेल्या मराठी माणसांना मराठीशी जोडण्याची आहे. महाराष्ट्राबाहेरही मराठी माणूस दुसऱ्या परिसरातल्या माणसांशी बोलत नाही. संमेलनाच्या माध्यमातून पारंपरिक सख्य निर्माण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे संमेलन दिल्लीत घेण्याची आमची तयारी असल्याचे नहार म्हणाले.
मराठी माणसाची फाळणी करू नका
मोदी-गडकरी यांना खूश करण्यासाठी हे प्रयत्न असल्याचा आरोप करणे म्हणजे मराठी माणसांत दुही निर्माण करण्यासारखेच आहे, असे संजय नहार कौतिकराव ठाले-पाटील यांनी लावलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ‘लोकमत’शी बोलत होते. गडकरी असो वा पवार हे पक्षीय, वैचारिकदृष्ट्या वेगळे असले तरी सर्वप्रथम ते मराठी आहेत. सगळ्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. मात्र, ‘खूश करण्यासाठी’ची भाषा वापरून महामंडळ अध्यक्षांनी मराठी अस्मितेची फाळणीच केली आहे, असा टोला नहार यांनी लावला.
मराठी साहित्य देशाचा-जगाचा विचार करते
दिल्लीत ज्या प्रकारे इतर भाषिक साहित्य संमेलने केवळ त्यांच्या भाषा आणि क्षेत्रापुरता विचार करतात त्या प्रकारे मराठी साहित्य नाही. मराठी साहित्य संमेलनात देशाचा, जगाचा विचार केला जातो. त्याचमुळे महाराष्ट्र स्थापनेच्या हीरक महोत्सवाप्रीत्यर्थ ९४वे साहित्य संमेलन दिल्लीत व्हावे, अशी बहुसंख्याकांची इच्छा असल्याचे नहार म्हणाले.