नागपूर : पहाटेची वेळ...हायवेवरून भरधाव जाणाऱ्या गाड्या...क्षणात काय घडले समजलेच नाही....काळाने घाला घातला अन् क्षणातच मृत्यूने गाठले. या अपघातात तीन तरुण डॉक्टर, एक वैद्यकीय प्रतिनिधी आणि गरिबीशी झुंज देणाऱ्या तरुणाला हिरावले. या पाचही जीवाला काळाने कसलीही संधी दिली नाही. त्यांना मदतही मिळू दिली नाही. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रच सुन्न झाले आहे.छिंदवाड्याजवळ शनिवारी पहाटे चारच्या सुमारास झालेल्या अपघातात नागपूरचे पाच जण ठार झाले. सकाळीच ही बातमी नागपुरात पोहोचली. शहरातील वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी सकाळपासूनच फोन, मेसेज, व्हॉटस्अपवरून एकमेकांना विचारणा करीत होती. प्रसारमाध्यमांकडेही चौकशी सुरू होती. उपराजधानीतील सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. अनिल गोल्हर यांचे पुत्र डॉ. साकेत, डॉ. आशिष बाबूराव भांडोले, सत्येंद्र अवधेश सिंग, विजयकुमार मेघशाम ठाकरे आणि डॉ. परमेश्वर लक्षदवार हे पाच जण एका आरोग्य शिबिराच्या निमित्ताने नागपूरहून नरसिंगपूर- सागर(मध्य प्रदेश) कडे जात होते. मात्र, काळ बनून समोर ठाकलेल्या ट्रकने जुगावानी टोल नाक्याजवळ या तरुणांच्या स्वीफ्टवर झडप घातली. स्वीफ्टचा बोनेटपर्यंतचा भाग ट्रकने गिळल्यासारखा केला. तब्बल ४ तासानंतर घटनास्थळी पोलीस पोहचले. तोपर्यंत सारेच संपले होते. हे वृत्त नागपुरात सकाळी ९ च्या सुमारास पोहचले अन् वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्राला जबर धक्का बसला. अनेक जण फोन, मेसेज, व्हॉटस्अपवरून या वृत्ताची शहानिशा करून घेत होते. नंतर अनेकांनी डॉ. गोल्हर यांच्या रामदासपेठेतील रुग्णालयात, निवासस्थानी धाव घेतली. मनमिळावू आणि सौजन्यशीलडॉ. साकेत, डॉ. आशिष आणि डॉ. परमेश्वर हे वानाडोंगरीच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पीजी (आर्थोपेडिक) करीत असल्याची चर्चा होती. मात्र, डॉ. साकेत वगळता अन्य दोघांबाबत रुग्णालयाच्या वरिष्ठांकडेही माहिती नव्हती. साकेत अत्यंत मनमिळावू आणि सौजन्यशील होता, असे त्याचे वरिष्ठ सांगत होते. शुक्रवारी दिवसभर तो ओपीडीत होता. रुग्णांची आस्थेने चौकशी करून त्यांच्यावर उपचार करण्याची डॉ. साकेतची शैली होती. वडील एवढे मोठे डॉक्टर आणि त्याच रुग्णालयात एचओडी असूनही, डॉ. साकेत त्याबाबत बडेजावपणा बाळगत नव्हता. रुग्ण, सहकारी डॉक्टर, कर्मचारी आणि वरिष्ठ या प्रत्येकासोबतच तो नम्रपणे वागायचा. त्याच्याबद्दल काय बोलावे, ते शब्दच सूचत नसल्याचे त्याचे एक वरिष्ठ सहकारी लोकमतशी बोलताना म्हणाले. आक्रित घडलेच कसे?नागपूर : आप्तस्वकीयांचा आक्रोश अन् रुग्णालयातील सहकाऱ्यांची हळहळ मनाला चटका लावणारी होती. हे आक्रित घडलेच कसे, असा प्रत्येकाचा सवाल होता. कुणीच काही बोलायच्या मन:स्थितीत नव्हते. अपघाताच्या वृत्ताने प्रत्येकालाच हादरवले होते. डॉ. गोल्हर यांचे निकटवर्तीय छिंदवाड्याकडे रवाना झाले होते. ते परत आल्यानंतरच काही सांगता येईल, असे सर्वजण सांगत होते. विजयचा मार्गच चुकला या अपघाताने विजय ठाकरेच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांच्या आशाअपेक्षाही संपवल्या. मूळचे गोंदियातील रहिवासी असलेले मेघश्याम ठाकरे यांची परिस्थिती हलाखीची. दुसऱ्याच्या शेतात राबून ते उदरनिर्वाह करायचे. येथे राहिलो तर मुलांनाही हलाखीतच जगावे लागेल, असा विचार करून त्यांनी नागपूरला धाव घेतली. कबाडकष्ट करीत ते विजय आणि त्याचा मोठा भाऊ दुर्गेशला शिकवू लागले. मात्र, शहराचे महागडे शिक्षण अवाक्याबाहेरचे असल्याने ते हतबल झाले. विजय मोखारे कॉलेजमध्ये बी.कॉमला शिकत होता. (प्रतिनिधी)
काळाने संधीच दिली नाही...!
By admin | Updated: May 31, 2015 02:34 IST