वितरण कार्यक्रमात गोंधळाची स्थिती : एका झोनमध्ये केवळ २५० डस्टबीनचे वाटपलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मनपाद्वारे कचरा संकलनाची नवी व्यवस्था सुरू करण्यात आली. यासाठी प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली होती. परंतु पहिल्याच दिवशी कचरा संकलनाच्या नव्या व्यवस्थेची पोलखोल झाली. बहुतांश वाहनांमध्ये ओला कचरा संकलित करण्यात आला. कचऱ्याचे संकलन करण्यास नकार दिल्याने बहुतांश नागरिकांनी सुकलेला कचरा जाळून टाकला. मंगळवारी झोन येथे २५० डस्टबीन वाटपाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला होता. परंतु डस्टबीन घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने चांगलाच गोंधळ उडाला. त्यामुळे आसीनगर झोनमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती तर नेहरूनगर, लकडगंज, सतरंजीपुरा झोनमध्ये मोठ्या संख्यने नागरिक डस्टबीन घेण्यास पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार एका नगरसेवकाला १५ जोडी डस्टबीन वितरणासाठी दिल्या आहेत. झोन कार्यालयामध्ये डस्टबीन वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र नागरिकांची संख्या अधिक असल्याने काही लोकांनाच ते मिळू शकले, त्यामुळे इतर नागरिकांना डस्टबीन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.सर्व १० झोनमध्ये डस्टबीन वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मंगळवारी व लक्ष्मीनगर झोनमध्ये महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते डस्टबीनचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. जिथून कचरा निघतो तेथेच ओला व सुकलेला कचरा वेगळा केला तर वेळीच पर्यावरणाचे नुकसान टाळता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. हा दिवस नागपूरकरांसाठी ऐतिहासिक आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी क्रांतिकारक पाऊल उचलले गेले असून याचे निश्चितच चांगले परिणाम भविष्यात दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, केंद्रीय शहर विकास मंत्रालयाचे अप्पर सचिव दीनदयाल आदी उपस्थित होते. काही झोनमध्ये आमदारांनी सहभाग घेतला. स्वच्छतेची दिली शपथझोनस्तरावर आयोजित डस्टबीन वितरण कार्यक्रमात उपस्थित अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सर्वांनी ओला व सुकलेला कचरा वेगवेगळा संग्रहित करण्याची शपथ घेतली.
डस्टबीनसाठी रेटारेटी
By admin | Updated: June 6, 2017 02:02 IST