विद्यार्थी गोंधळले : अभ्यासक्रमात फरक असल्याने टेन्शन नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी असलेल्या ‘नीट’संदर्भात (नॅशनल एलिजिबिलिटी अॅन्ड एन्ट्रन्स टेस्ट) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘डीएमईआर’तर्फे राज्यात घेतली जाणारी ‘एमएचसीईटी’ ही परीक्षा होणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ‘नीट’ व ‘एमएचसीईटी’ यांच्या अभ्यासक्रमात फरक असल्याने अवघ्या काही आठवड्यांमध्ये अभ्यास कसा होणार, या विचारामुळे विद्यार्थी तणावात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे याबाबत अधिकाऱ्यांकडे कुठलेही ठोस उत्तर नाही.राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ‘सेल’तर्फे घोषित कार्यक्रमानुसार ‘एमएचसीईटी’ ५ मे रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील चार लाख नऊ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. नागपूर विभागातील हजारो विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रेदेखील जारी करण्यात आली आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेशेच्छुक असणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ‘एमएचसीईटी’ होणार की नाही याबाबत कुठलेही चित्र स्पष्ट झालेले नाही.याबाबत विभागीय अधिकारी डॉ.संजय पराते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीदेखील ठोस माहिती दिली नाही. आम्हाला अद्याप मुंबईहून कुठलेही दिशानिर्देश मिळालेले नाहीत. त्यामुळे आमची तयारी सुरू आहे. ‘एमएचसीईटी’ म्हणा किंवा इतर प्रवेश परीक्षा, मुले दोन वर्षे यासाठी जीव तोडून मेहनत करत असतात. ऐनवेळी अशा प्रकारे परीक्षा बदल होणार असल्याचा निर्णय त्यांना तणावात टाकणारा आहे. त्यामुळे सरकारने याबाबत अगोदरच भूमिका स्पष्ट करायला हवी होती. विद्यार्थ्यांचा विचार करता ‘नीट’ची परीक्षा पुढील वर्षीपासून अनिवार्य करणे जास्त संयुक्तिक ठरेल.-डॉ.देवेन्द्र बुरघाटे, प्राचार्य, शिवाजी विज्ञान महाविद्यालयअद्याप स्थिती स्पष्ट झाली नसल्यामुळे आम्हीदेखील संभ्रमातच आहोत. ऐन वेळेवर अशा प्रकारचा निर्णय आल्यामुळे विद्यार्थी व पालक अस्वस्थ होणे साहजिकच आहे. परंतु अशा प्रसंगी पालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या प्रवेश परीक्षांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे मुले अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष कसे देतील यावर भर दिला गेला पाहिजे. - डॉ. संजय चरलवार, प्राचार्य, मोहता विज्ञान महाविद्यालय
‘नीट’ अभ्यास कसा करणार ?
By admin | Updated: April 29, 2016 07:12 IST