कामठी : कामगारनगरी असलेल्या कामठी येथील रोजंदारी मजुरांना लॉकडाऊनचा फटका बसताना दिसतो आहे. रोजगारच नाही तर पोट कसे भरायचे? असा प्रश्न मजुराकडून उपस्थित केला जात आहे.
कामठी शहरात मोठ्या प्रमाणात बीडी व विणकर कामगार वास्तव्यास आहे. हे दोन्ही उद्योग बंद पडल्याने अनेक कुशल कामगारावर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह हे कामगार करीत आहेत. शहरातील अनेक कामगार दिवसभर कमवितात यातून मिळालेल्या मजुरीतून पोटाची खळगी भरतात. शहरातील मेनरोडवरील चावडी चौक येथे पुरुष व महिला कामगार सकाळी ९ वाजता कामाच्या शोधात उपस्थित राहतात. कंत्राटदार, खासगी घरमालक येथून प्रतिदिन कामगाराला ठराविक मोबदल्यात काम देत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे मोठ्या कंत्राटदारांनी कामे बंद केली आहेत.
सोमवारी सकाळी ९ वाजेपासून एक वाजेपर्यंत ठिय्यावर महिला व पुरुष कामगार कामाच्या प्रतीक्षेत होते. आज काम मिळाले नाही तर घरची चूल पेटणार कशी असा सवाल नंदा लांजेवार, कांता खंडारे, राजेश चौरसिया, विनोद ढोले या कामगारांनी केला. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.