जगदीश जोशी
नागपूर : गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा कुख्यात सुहास ठाकूर आपल्या साथीदारांच्या माध्यमातून हनी ट्रॅपही करीत होता. फसवणुकीचा भंडाफोड झाल्यानंतर पीडितांना तक्रार नोंदविण्यापासून रोखण्यासाठी ही क्लृप्ती वापरण्यात येत होती. या टोळीचा सावज झालेल्या युवकांकडून चौकशीदरम्यान याचा खुलासा झाला. गुरुवारी १७.६० लाखाची फसवणूक झालेल्या हैदराबादच्या युवकाने ही तक्रार दाखल केली आहे.
अंबाझरी पोलिसांनी सुहास ठाकूर आणि कुख्यात विकास लोंदासेसह या टोळीच्या आठ आरोपींना अटक केली आहे. या टोळीने वीट भट्टी, गोव्यात कसिनो आणि आयटीसी कंपनीत फ्रेंचाईजी देण्याची बतावणी करून शेकडो नागरिकांची फसवणूक केली आहे. ही टोळी जग्वार, मर्सिडीज, फॉर्च्युनरसारखी महागडी वाहने किरायाने घेऊन नागरिकांना प्रभावित करीत होती. त्यांच्याजवळ नेहमी पिस्तुल राहत होते. या पिस्तुलचे लायसन्स असून ते आपल्या रक्षणासाठी बाळगत असल्याचे सांगत होते. पॉश हॉटेलमध्ये पार्टी आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी ते लाखो रुपये देत होते. त्यामुळे नागरिक सहज त्यांच्यावर विश्वास ठेवत होते. या टोळीत सुहास-विकासनंतर प्रदीप, नीरज आणि त्याच्या प्रेमिकेची महत्वाची भूमिका आहे. सुहास, विकास आणि प्रदीप नागरिकांना फसवून रक्कम वसूल करण्याचे काम करीत होते. ही रक्कम नीरजला देत होते. नीरजचे वडील गुन्हेगार आहेत. त्यांना एका प्रकरणात तुरुंगवास झाल्याची माहिती आहे. नीरज मनीषनगरच्या एका फ्लॅटमध्ये प्रेमिकेसोबत राहतो. या फ्लॅटवरच ही टोळी नाईट पार्टी करीत होती. ठाकूर टोळी ठरविलेल्या योजनेनुसार नीरजच्या प्रेमिकेचा हनी ट्रॅपसाठी वापर करीत होती. तिला मोठे सावज फसविण्याचे काम देण्यात येत होते. फसवणूक करायची त्याला नाईट पार्टीत बोलविण्यात येत होते. तेथे नीरजची प्रेमिका त्याच्याशी मैत्री करीत होती. ठरलेल्या योजनेनुसार त्याच्यासोबत अश्लील कृत्य करण्यात येत होते. त्याची क्लिपिंग तयार करून या क्लिपिंगच्या मदतीने त्याचे तोंड बंद करण्यात येत होते. या टोळीने अनेक पीडितांची क्लिपिंग तयार करून कोट्यवधी रुपये कमविले आहेत. अंबाझरी पोलिसांनी आतापर्यंत नीरज आणि प्रदीपला आरोपी केले नाही. त्यांनी विकास लोंदासेला वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फटकारल्यामुळे त्यांची डाळ शिजली नाही. या प्रकरणात ज्या पद्धतीने नवे खुलासे होत आहेत त्यामुळे अंबाझरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिक आहे. लोकमतने झोन २ च्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस प्रत्येक पीडित व्यक्तीची तक्रार नोंदविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्या स्वत: तपासाची प्रगती जाणून घेणार आहेत.
...........
नाही झाले बहिणीचे लग्न
हैदराबादच्या युवकाने बहिणीच्या लग्नासाठी ११ लाखाची एफडी केली होती. ही टोळी वर्षभरापूर्वी हैदराबादला गेली होती. तेथे सर्व सेव्हर स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांनी पाच कोटी रुपयांचे डीलिंग प्रलंबित असल्याचे सांगून दोन महिन्यात गुंतवणुकीची रक्कम दुप्पट परत करण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे युवकाने बहिणीच्या लग्नासाठी एफडीच्या रकमेसह १७.६० लाख रुपये सुहासला ट्रान्सफर केले होते. यामुळे या युवकाच्या बहिणीचे अद्याप लग्न होऊ शकले नाही
जग्वारमध्ये लपविण्यात येत होते पिस्तुल
या प्रकरणात सुहास नेहमी एक जग्वार आणि फॉर्च्युनरचा वापर करीत होता. या गाड्यांनीच तो दुसऱ्या राज्यात जात होता. जग्वारमध्येच पिस्तुल लपविण्यात येत होते. प्रकरणातील पीडित पहिल्या दिवसापासून जग्वार आणि पिस्तुलबाबत माहिती देत आहेत. परंतु आतापर्यंत त्या दिशेने तपास झाला नाही. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुहास आणि विकासचे गुन्हेगार साथीदार अंबाझरी ठाण्याजवळ फिरताना दिसतात. त्यांना पाहून अनेक पीडित ठाण्यातून घाबरून परत गेले आहेत.
..............