लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानकाची सफाई करण्याची ड्युटी. महिनाभर काम करून केवळ साडेसात हजार रुपये हातात पडतात. परंतु अशा स्थितीतही पैशाचा मोह न बाळगता एका सफाई कर्मचाऱ्याने प्लॅटफार्मवर सापडलेले आठ हजार रुपये असलेले पाकीट परत करून आपल्या इमानदारीचा परिचय करून दिला आहे. या सफाई कर्मचाऱ्याने दाखविलेली इमानदारी नक्कीच इतरांना प्रेरणा देणारी आहे.रामचंद्र निमजे नावाचा सफाई कर्मचारी रेल्वेस्थानकावर कार्यरत आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्य या कर्मचाऱ्याला प्लॅटफार्म, रेल्वे रूळ, रेल्वेस्थानकाचा परिसर स्वच्छ करावा लागतो. महिनाभर काम करून त्याला केवळ साडे सात हजार रुपये वेतन मिळते. या वेतनात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याला करावा लागतो. रेल्वेस्थानकावर काम करताना २६ जानेवारीला त्याला प्लॅटफार्म क्रमांक १ वर स्लिपर क्लास वेटिंग हॉलजवळ एक पाकीट सापडले. पाकीट उघडून पाहिले असता त्यात आठ हजार रुपये होते. लगेच त्याने ते पाकीट उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात आणून जमा केले. पाकिटात रूपेश कुमार या व्यक्तीचे नाव आढळल्याने ध्वनिक्षेपकाहून त्यांच्या नावाची घोषणा केली असता ते त्वरित उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात हजर झाले. पाकीट मिळाल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. सोबतच रामचंद्र निमजे या सफाई कर्मचाऱ्याला त्यांनी स्वखुशीने ५०० रुपये बक्षीस दिले. निमजे हे पाकिटातील आठ हजार रुपयांची रक्कम घेऊ शकले असते. परंतु इमानदारी दाखवून त्यांनी ही रक्कम परत करून इतरांसमोर आपला आदर्श ठेवला आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावरील सफाई कर्मचाऱ्याची इमानदारी; सापडलेले आठ हजार परत केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 09:54 IST
पैशाचा मोह न बाळगता एका सफाई कर्मचाऱ्याने प्लॅटफार्मवर सापडलेले आठ हजार रुपये असलेले पाकीट परत करून आपल्या इमानदारीचा परिचय करून दिला आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावरील सफाई कर्मचाऱ्याची इमानदारी; सापडलेले आठ हजार परत केले
ठळक मुद्देस्वखुशीने दिले ५०० रुपये बक्षीस