सुमेध वाघमारे नागपूर : ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची औषधे वापरण्याची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि ‘मार्ड’ने गुरुवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. खासगी रुग्णालयांच्या ओपीडी सेवा बंद असल्याने रुग्णांना उपचारासाठी मोठी धावपळ करावी लागली. यातच मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टर व इंटर्न संपावर गेल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली.
महाराष्ट्र सरकारने ‘सीसीएमपी’ हा कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे, ज्याला ‘आयएमए’ सुरुवातीपासूनच विरोध करत आहे. या आंदोलनात आता सेंट्रल ‘मार्ड’सह ‘एफएआयएमए’, ‘एमएसआरडीए’, ‘एएसएमआय’ आदी संघटनांही पुढे आल्या आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर दरम्यान ‘आयएमए’ महाराष्टÑाचे अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी यांच्या नेतृत्वात नागपूर ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. राजेश सावरबांधे, सचिव डॉ. जितेंद्र साहू, पुढील वर्षीचे अध्यक्ष सचिन गाठे, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. आशिष दिसावल, डॉ. बी. के. शर्मा, डॉ. राजेश अग्रवाल, डॉ. अर्चना कोठारी व ‘मार्ड’च्या सदस्यांनी ‘आयएमए’ सभागृहात बैठक घेऊन शासन निर्णयाचा निषेध नोंदविला. त्यांतर ते जिल्हाधिकाºयांच्या नावाचे निवेदन अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांना दिले.
रुग्णसेवा विस्कळीत, ओपीडी बंद
‘आयएमए’च्या आवाहनानुसार, नागपूर शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयांनी गुरुवारी सकाळी ८ ते दुसºया दिवशी सकाळी ८ पर्यंत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद ठेवले. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना निराश होऊन परत जावे लागले. अनेक मोठ्या रुग्णालयेही पहिल्यांदाच या संपात सहभागी झाल्याने रुग्णांचे जास्त हाल झाले. केवळ आपत्कालीन (इमर्जन्सी) सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या.
मेयो, मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या प्रतिक्षेत रुग्ण
मेयो, मेडिकलचा कणा असलेले निवासी डॉक्टरांसोबतच इन्टर्न डॉक्टरही गुरुवारी सकाळपासून संपावर गेल्याने ओपीडीसह, वॉर्ड, शस्त्रक्रिया व विविध चाचण्यांचा मोठा भार वरीष्ठ डॉक्टर व वैद्यकीय अधिकाºयांवर आला. मोजकेच वरीष्ठ डॉक्टर असल्याने उपचार मिळायला बराच उशीर लागल्याच्या रुग्णांच्या तक्रारी होत्या. संपातून अपघात विभाग वगळण्यात आला होता. त्यामुळे केवळ गंभीर रुग्णांवरच उपचार होऊ शकले. ‘महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन’च्या सदस्यांनी काळ्या फिती लावून या आंदोलनाला प्रतिकात्मक पाठिंबा दिला.