-लोकमत इम्पॅक्ट
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) काही डॉक्टर व्यवसायरोध भत्ता (एनपीए) घेऊनही खासगी प्रॅक्टिस करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रकाशित करताच खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने वृत्ताची दखल घेत सर्व विभागप्रमुखांना पत्र दिले. यात त्यांच्या विभागातील कोणते डॉक्टर किती वाजता येतात, किती वाजता घरी जातात तसेच ते खासगी प्रॅक्टिस करतात का, याची माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. परिणामी, अनेकांचे धाबे दणाणले आहे.
शासकीय सेवेतील डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करू नये यासाठी पूर्वी मूळ पगाराच्या २५ टक्के व्यवसायरोध (नॉन प्रॅक्टिस अलाउन्स) दिला जात असे. २०१२ मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) सुधारित शासनादेशाद्वारे व्यवसायरोध भत्त्यात दहा टक्क्याने वाढ करीत ३५ टक्के व्यवसायरोध भत्ता केला. हा भत्ता घेणे बंधनकारकही केले. परंतु त्यानंतरही खासगी प्रॅक्टिस धडाक्यात सुरू आहे. यामुळे ‘ओपीडी’च्या वेळेत न पोहचणे, उशिरा येऊन लवकर जाणे, रुग्णालयाच्या वेळेत खासगी प्रॅक्टिससाठी निघून जाणे, शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आपल्या हॉस्पिटलमध्ये वळविणे आदी प्रकार होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने मांडले. याची दखल मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी घेऊन या संदर्भात विभागप्रमुखांची (एचओडी) जबाबदारी निश्चित केली. सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बायोमॅट्रिक बंद आहे. यामुळे विभागप्रमुखाने कोण डॉक्टर वेळेवर येतात व वेळेवर जातात याची माहिती ठेवण्याची व कोण डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतात याची माहिती अधिष्ठाता कार्यालयाला देण्याच्या सूचना केल्या आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये याची जबाबदारी विशेष कार्य अधिकारीसोबतच तेथील एचओडींकडे सोपविण्यात आली आहे.
‘लोकमत’शी बोलताना अधिष्ठाता डॉ. मित्रा म्हणाले, खासगी प्रॅक्टिसच्या संदर्भात ‘एचओडी’कडून वेळोवेळी माहिती घेतली जाणार आहे. त्यानुसार वरिष्ठांना कळविण्यात येणार आहे.