नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी जरीपटका भागातील मनोरुग्णालय रोडवरील अतिक्रमणाच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावला व १७ मार्च रोजी व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.यासंदर्भात बेझनबाग महिला कृती समितीने जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विकास आराखड्यानुसार मनोरुग्णालय रोड ८० फुटांचा असून अतिक्रमणामुळे हा रोड कुठे ६० तर कुठे ४० फुटांचा शिल्लक राहिला आहे. यामुळे रोडने जाणाऱ्या-येणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले, पण त्यात समाधानकारक माहिती दिली नाही. यामुळे न्यायालयाने त्यांना समन्स बजावला.(प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाचा समन्स
By admin | Updated: March 15, 2016 04:56 IST