राकेश घानोडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाल व हंसापुरीत झालेल्या दंगल व जाळपोळीच्या घटनेचा कथित सूत्रधार फहीम खान शमीम खान व आरोपी युनूस अब्दुल हाफिज यांच्या घरावरील बुलडोझर कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी स्थगिती दिली.
या कारवाईमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाले, असे प्राथमिक पुरावे न्यायालयाला आढळून आले. कारवाई करताना घरमालकांना सुनावणीची संधी देण्यात आली नाही. मनमानी व एकतर्फी पद्धतीने कारवाई करण्यात आली असेही न्यायालय म्हणाले. न्यायालयाने महानगरपालिकेला नोटीस बजावून येत्या १५ एप्रिलपर्यंत वादग्रस्त कारवाईवर स्वतःची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच, वादग्रस्त कारवाईला स्थगिती दिली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. घरमालकांतर्फे एड. अश्विन इंगोले यांनी कामकाज पाहिले.