नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्टच्या रिट याचिकेवर सुनावणी केल्यानंतर नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन व महानगरपालिका यांना नोटीस बजावून २७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. ही याचिका जमिनीसंदर्भात आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील माहितीनुसार, पोद्दारेश्वर राम मंदिराच्या बाजूला मौजा बर्डी येथे ट्रस्टची सर्व्हे क्र. २३५४ (६३४.५० चौरस मीटर) व २३५५ (९४२५.८० चौरस मीटर) ही जमीन आहे. १९७२ मध्ये मनपाने ट्रस्टची परवानगी न घेता सर्व्हे क्र. २३५५ या जमिनीवर स्वत:चे नाव चढवले. या ठिकाणी ट्रस्टने बांधलेल्या गाळ्यांमध्ये १३ भाडेकरू १९३४ पासून पूजेचे साहित्य, पेढे, खोवा इत्यादी वस्तू विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. ते मनपाला नियमित कर देत आहेत. असे असताना मेट्रो रेल्वेसाठी ही जमीन बळजबरीने घेतली जात आहे. ट्रस्टला नोटीस व मोबदला न देता ही कारवाई केली जात आहे. याविरुद्ध मनपा व मेट्रो रेल्वेला निवेदन सादर करण्यात आले होते. पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सुधीर महाजन यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
मेट्रो रेल्वेला हायकोर्टाची नोटीस
By admin | Updated: February 16, 2017 02:45 IST