नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या हिवाळी परीक्षांतून एक नवा इतिहास निर्माण होणार आहे. ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाच्या दृष्टीने विद्यापीठाने ‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. यासाठी परीक्षा भवनात अद्ययावत ‘स्कॅनिंग मशीन’ व संगणक संच लावण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. लवकरच हे मूल्यांकन केंद्र पूर्णपणे स्थापन होणार असून अशा प्रकारचे केंद्र उभारणारे नागपूर विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ ठरणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.राज्य शासनाच्या राजेश अग्रवाल समितीच्या शिफारसींनुसार विद्यापीठात तंत्रज्ञानाच्या मदतीचे मूल्यांकन करण्यावर भर देण्याचे निर्देश राज्यपालांनीच दिले होते. त्यानुसार यंदाच्या सत्रापासून मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन सारे काही ‘आॅनलाईन’ करण्याचा विद्यापीठाने निर्णय घेतला. विद्यापीठ आणि ‘एमकेसीएल’ यांच्यात झालेल्या नव्या करारामुळे नवीन शैक्षणिक सत्रापासून आॅनलाईन पुनर्मूल्यांकनाची जबाबदारी एमकेसीएलकडे सोपविण्यात आली आहे. ‘एमकेसीएल’च्या मदतीने संपूर्ण मूल्यांकन हे आॅनस्क्रीन होणार आहे. यासाठी अद्ययावत मूल्यांकन केंद्र स्थापन करण्याची गरज होती. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या.मूल्यांकनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असे मूल्यांकन केंद्र स्थापन करण्यात येत आहे. या केंद्रावर उत्तरपत्रिकांचे थेट ‘स्कॅनिंग’ होणार असून मूल्यांकनाचीदेखील सुविधा राहणार आहे. ‘स्कॅनिंग’साठी १२६ मशीनची आवश्यकता भासणार आहे. यापैकी यंदा ६० मशीन लावण्यात येणार असून त्याचे काम युद्धस्तरावर सुरू असून या आठवड्यात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर व्यावसायिक परीक्षांचे मूल्यांकन सुरू करण्यात येईल. यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सॉफ्टवेअर’ची चाचणीदेखील झाली असून प्राध्यापकांना याचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे. पुढील काळात उत्तरपत्रिका तपासण्यासाठी जवळपास ४०० संगणक असणारे मोठे केंद्र उभारण्याचा विद्यापीठाचा मानस आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.(प्रतिनिधी)एका दिवसात होणार २८ हजार उत्तरपत्रिकांचे ‘स्कॅनिंग’४हे मूल्यांकन केंद्र पूर्णपणे तयार झाल्यानंतर येथे १२६ ‘स्कॅनिंग मशीन’ राहणार आहेत. या मशीनच्या मदतीने एका दिवसात २८ हजार उत्तरत्रिकांचे ‘स्कॅनिंग’ करणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण प्रक्रिया वेगवान पद्धतीने होणार असल्यामुळे निकालदेखील झटपट लागतील. फेरमूल्यांकनाची प्रक्रियादेखील सोयीस्कर होणार असल्याने विद्यार्थ्यांना लवकर निकाल हाती मिळतील, असा दावा प्र-कुलगुरूंनी केला आहे.
‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनासाठी ‘हायटेक’ पाऊल
By admin | Updated: November 5, 2015 03:31 IST