नरेश डोंगरे ।
नागपूर : स्वत:सोबत दुसऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणारी स्टंटबाजी करणाऱ्या टीम फोर्टीसेव्हनच्या बहुतांश सदस्यांजवळ ‘नमस्ते लंडन’ची वाहने असल्याची माहिती चर्चेला आली आहे. पोलिसांच्या तपासात हा मुद्दा उघड झाल्यास स्टंटबाज धनिकबाळं आणि त्यांना पैशाच्या जोरावर रान मोकळे करून देणारे पालकही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.२६ जानेवारीला नागपूरकर मंडळी गणराज्य दिनाच्या सोहळ्याचा आनंद घेत होती, तर गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार म्हणून पोलिसांनी तिकडे बंदोबस्तावर भर दिला होता. अशात सैराट झालेली धनिकबाळं वंजारीनगर पुलावर कारची स्टंटबाजी करीत होती. एकापाठोपाठ चार कार स्केट केल्या जात होत्या. एकमेकांच्या कार एकमेकांवर आदळून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे स्वत:च्या जिवासोबत या पुलावरून जाणाऱ्या-येणाऱ्या दुसऱ्या वाहनचालकांच्या जिवाला धोका होऊ शकतो, याची कल्पना असूनही ‘वेगळ्या धुंदीत’ असलेले
‘टीम-४७’चे हे बिघडलेले रईसजादे आरडाओरड करून स्टंटबाजी करीत होते. त्यांचे हे विक्षिप्त सादरीकरण सर्वसामान्यांच्या काळजाचे ठोके चुकविणारे होते. त्याचमुळे या स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल होताच नागपूरकरांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. या स्टंटबाजीच्या निमित्ताने टीम-४७ हा कसरतबाज ग्रुपही सर्वत्र चर्चेला आला. इस्टाग्रामवरच्या ‘टीम ४७’मध्ये बहुतांश सैराट झालेली धनिकबाळं आहेत. त्यांच्याकडे महागड्या लक्झरी कार आहेत. यातील बहुतांश कार नमस्ते लंडनच्या आहेत. अर्थात्, डिफॉल्ट आहेत. फायनान्सवर घेतलेल्या किंवा वादग्रस्त व्यवहारात अडकलेल्या
कारच्या चार ते पाच किस्त थकल्यास कंपनीकडे स्नॅचर म्हणून काम करणारे दबंग दलाल ती कार मालकाच्या ताब्यातून हिसकावून घेतात. तडजोड न झाल्याने हे दलाल कुणालाही जेवढे कर्ज थकीत आहे, तेवढ्या रकमेत विकून मोकळे होतात. अर्थात चांगल्या कंडिशनमधील १० ते २० लाखांची कार ५ ते ७ लाखांत विकत मिळत असल्याने धनिकबाळं ती विकत घेतात. कागदपत्रांची त्यांना पर्वा नसते. वाहनांच्या अशा व्यवहाराला संबंधित वर्तुळात ‘नमस्ते लंडन’ म्हणून ओळखले जाते. या कारला मॉडीफाईड करतात. नंतर ती कार फटाके फोडत, कर्कश आवाज करीत सुसाट वेगाने दाैडवतात. गुरुवारी पोलिसांनी जप्त केलेली वाहने ‘नमस्ते लंडन’ची असावी, अशी शंका आहे. ही शंका खरी निघाल्यास सैराट धनिकबाळांसोबत त्यांचे पालकही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
---
आम्ही चौकशी करीत आहोत : उपायुक्त आवाड
या संबंधाने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांच्याकडे विचारणा केली असता, ही वाहने कुणाची आहे, कशी खरेदी केली, त्याची आम्ही कसून चौकशी करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
----