कमलेश वानखेडे/राजीव सिंग नागपूरनागपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी किसान यात्रेसाठी दिल्लीहून विमानाने नागपुरात येताना ‘इकॉनॉमी क्लास’मधून प्रवास करीत प्रवाशांसह बच्चे कंपनीशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओवरून ‘मन की बात’ सांगत असताना राहुल यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी भेटून ‘दिल की बात’ मांडली. सर्वांसोबत फोटोही काढले. विशेष म्हणजे ‘आॅटोग्राफ’ असलेले स्वत:चे छायाचित्रही प्रवाशांना भेट दिले. राहुल यांचा साधेपणा सर्वांनाच भावला. नागपुरात उतरलेल्या प्रवाशांमध्ये राहुल यांच्यासोबत विमानात घालविलेल्या क्षणांची, त्यांच्या साधेपणाची चर्चा रंगली होती.राहुल गांधी यांच्यासोबत विमान प्रवास केलेल्या काही प्रवाशांनी नागपूर विमातळावर ‘लोकमत’शी संवाद साधला. नागपुरातील म्हाळगीनगर येथील रहिवासी ज्योती भोंगळे या पती दीपक व नभा आणि आभा या दोन मुलींसह त्याच विमानाने नागपुरात आल्या. मुलगी नभा व आभा यांच्या चेहऱ्यावर राहुल यांच्या भेटीचा आनंद दिसत होता. हातातील मोबाईलमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत काढलेला फोटो दाखवीत राहुल हे मोकळ्या मनाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगी नभा म्हणाली, विमानात राहुल गांधी यांना पाहून आम्हा सर्वांना आश्चर्य वाटले. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना सोबत फोटो काढण्याची विनंती केली असता त्यांनी ती लगेच मान्य केली. फोटो काढल्यानंतर एक लहान मुलगा त्यांचा ‘आॅटोग्राफ’घेण्यासाठी गेला असता त्यांनी त्याला आपल्या बॅगमधील आॅटोग्राफ’असलेला स्वत:चा फोटो काढून दिला. त्यांच्याकडे आणखी काही फोटो होते. ते त्यांनी प्रवाशांना दिले. आपल्यालाही एक फोटो दिल्याचे तिने सांगितले. विमानातून उतरल्यानंतर प्रवासी राहुल यांच्या भेटीचा अनुभव आपल्या नातेवाईक, मित्रांना मोबाईलवर सांगत होते. एका खूप मोठ्या व्यक्तीशी भेट झाल्याचा आनंद व समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते.(प्रतिनिधी)‘बहुत ही सिम्पल हैं राहुल’राहुल गांधी यांच्यासोबत फोटो काढलेल्या नभा व आभा भोंगळे या दोन्ही बहिणींनी ‘बहुत ही सिम्पल हैं राहुल’अशी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, राहुल सामान्य व्यक्तींसारखे सर्वांशी भेटत होते. चर्चा करीत होते. कुणी विनंती करताच सोबत फोटो काढत होते. एका लहान मुलाने त्यांना ‘आॅटोग्राफ’ मागितला असता त्यांनी लागलीच आपल्या बॅगमधील ‘आॅटोग्राफ’ असलेला स्वत:चा फोटो काढून त्याला दिला.
इकॉनॉमी क्लासमध्ये ‘दिल की बात’...
By admin | Updated: April 30, 2015 02:17 IST