लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यातील एका दारुड्याने आधी स्वत:च्या मुलीला़ नंतर भावाला आणि त्यानंतर आईला मारहाण करून जबर जखमी केले. इटारसी पुलाजवळच्या झोपडपट्टीत सोमवारी दुपारी ही घटना घडली. गजर वनवास शेंडे असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी गजर दारूच्या नशेत त्याची मुलगी दामिनी हिला विनाकारण मारत असल्याचे पाहून त्याचा भाऊ धरम याने त्याला हटकले. त्यामुळे लाकडी फळी घेऊन तो धरमवर धावला. ते पाहून दुसरा भाऊ राजेशने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता गजरने राजेशला डोक्यावर मारून जबर जखमी केले. तो रक्तबंबाळ झाल्याचे पाहून त्याची आई नंदाबाई वनवास शेंडे दोन भावांच्या मध्ये आली. आरोपी गजरने नंदाबाईच्या पायावर फरशीचा तुकडा मारून त्यांनाही गंभीर जखमी केले. आरडाओरडा ऐकून शेजारी धावले. त्यांनी आरोपीला कसेबसे रोखले. नंदाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी गजरविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
----
पत्नीला शिवीगाळ करणाऱ्यावर हल्ला
नागपूर : पत्नीला फोन करून शिवीगाळ करणाऱ्याला लोखंडी पट्टीने हल्ला करून एका आरोपीने त्याला गंभीर जखमी केले. रोहित नरेंद्र चांदेकर (वय ३०) असे जखमीचे तर महादेव नामदेव पाैनीकर (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे.
चांदेकर कोलबा स्वामी चौक, जुनी मंगळवारीत राहतो तर आरोपी पाैनीकर लाडपुरा नंदगिरी मार्गावर राहतो. हे दोघेही नातेवाईक आहेत. चांदेकरने पाैनिकरच्या पत्नीला फोन करून शिवीगाळ केली. तो राग मनात ठेवून सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास पाैनिकर चांदेकरच्या घरी धडकला. पत्नीला शिवीगाळ का केली, असा प्रश्न करून आरोपीने चांदेकरला लोखंडी पट्टीने हल्ला करून जबर जखमी केले. चांदेकरने दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----