लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका प्रशासनाने मागील काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली हॉकर्सविरोधात धडक कारवाई सुरू केली. यामुळे हजारो लोकांपुढे रोजीरोटीचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. मनपाच्या कारवाईविरोधात सोमवारी शहरातील फेरीवाल्यांनी संविधान चौकात जोरदार निदर्शने केली.
आमदार विकास ठाकरे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदन देऊन चर्चा केली. फेरीवाल्यांवर होणारी कारवाई तत्काळ थांबवून त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार मनपाने फूटपाथवरील विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी १७ डिसेंबर २०१९ रोजी वेंडिंग कमिटीची निवडणूक घेतली. गत काळात फूटपाथ दुकानदारांसाठी शहरात ५३ झोन निश्चित करण्यात आले होते. परंतु वर्ष झाले तरी कमिटी गठित केली नाही. फेरीवाला झोनमध्ये विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध केली नाही. दुसरीकडे धडक अतिक्रमण कारवाई राबविली जात आहे. यामुळे हजारो विक्रेते बेरोजगार होत असल्याने आंदोलन करावे लागत असल्याचे संघटनेचे महामंत्री रज्जाक कुरेशी यांनी सांगितले.
शिष्टमंडळात मारोती पटेल, अविनाश तिरपुडे, गोपी आंभोरे, संदीप गुहे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.