लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा मार्गावरील वारंगा येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, आय.आय.आय.टी अभिमत विद्यापीठाचा परिसर विकसित होत आहे. भविष्यातील वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरणकडून या विद्यापीठांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळावा यासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी येथे आयोजित आढावा बैठकीत दिल्या.
शुक्रवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी राष्ट्रीय विधी विद्यापीठ परिसरात आढावा बैठक घेऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पावसाचे पाणी परिसरात निर्माण केलेल्या तलावात साठविण्यात येणार असल्याने येथे पाण्याची समस्या राहणार नाही. तसेच विजेची बचत व्हावी यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने सादरीकरण करतेवेळी देण्यात आली.
विद्यापीठात शिक्षण घेतेवेळी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होता काम नये. त्यांना चांगल्या सुविधा देणे आपले कर्तव्य असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त संजीवकुमार, महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे तसेच विधी विद्यापीठाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.