- संपूर्ण मार्गावर दुतर्फा लावली जातात वाहने : अनेकदा अपघातांचा करावा लागतो सामना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात रस्तोरस्ती, बाजारात लागणाऱ्या अवैध पार्किगचा मुद्दा फार जुना आहे. शहर विकासाच्या मार्गावर अग्रेसर झाले आहे. मात्र, हा मुद्दा अजूनही निकाली निघालेला नाही. अवैध पार्किगला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. असा प्रकार रिंगरोडवरील मानेवाडा चौक ते तुकडोजी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावर दिसून येतो. हा रस्ता मोठा आहे आणि या दोन ते तीन किमीच्या मार्गावर विविध दुकाने आहेत. बँक, अमृततुल्य चहाची दुकाने, चहाच्या टपऱ्या, रेस्टराँ, स्ट्रीट फूडचे स्टॉल्स, बीअर बार, सुपर बाजार, ज्वेलर्स, कापड विक्रीची दुकाने अशी सर्वच आहेत. येथे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांचे रस्त्याच्या दुतर्फा अवैध पार्किग होत असते. हा सलग मार्ग असल्याने सिग्नलवरून सुटलेली वाहने मानेवाडा चौकाकडे किंवा तुकडोजी पुतळ्याकडे येताना वेग धरतात. मात्र, अवैध पार्किगमुळे बरेचदा अपघाताचा सामना करावा लागतो. हा मार्ग अनेक अपघातांचा साक्षीदार राहिला आहे.
मानेवाडा चौक
रिंगरोडवर हा चौक येतो. या चौकातून दक्षिणेकडे एक रस्ता बेसा भागाकडे तर उत्तरेकडे एक रस्ता तुकडोजी पुतळ्याकडे जातो. पूर्वेकडे उदयनगर चौक तर पश्चिमेकडे ओंकारनगर चौक, छत्रपती चौकाचा रस्ता आहे. चौकात पेट्रोल पंप, बार, चहाची दुकाने, फूड स्टॉल्स, कमर्शियल इमारती आहेत. चहुबाजूंनी मोठी ट्रॅफिक असते आणि सोबतच चौकात अवैध पार्किग असतेच. ऑटोचालक कुठेही उभे हाेतात.
सिद्धेश्वर सभागृह चौक
या चौकातून एक रस्ता पश्चिमेकडे चंद्रमणीनगरकडे तर पूर्वेकडे शारदा चौकाकडे एक रस्ता जातो. उत्तरेकडे तुकडोजी पुतळा चौक आहे तर दक्षिणेकडे मानेवाडा चौक आहे. त्यामुळे, वाहनांची सतत रेलचेल असते. चौकात मात्र सिग्नल नाही. सिद्धेश्वर सभागृह चौकात बाजूलाच काॅर्नरवर स्तूप आहे. येथे संध्याकाळी लोक बसलेले असतात. त्यांची वाहनेही तेथेच पार्क केली जातात. थोडे पुढे आले की डॉमिनोज पिज्जा, मटन शॉप आदी आहेत. येथे मोठ्या प्रमाणात अवैध वाहनांचे पार्किग होत असते.
तुकडोजी पुतळा चौक
या चौकात तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल आहे. लागूनच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. उत्तरेकडे हनुमाननगर चौक व बाजूनेच मेडिकल चौकाचा रस्ता आहे. पूर्वेकडे छोटा ताजबाग येतो. येथे सुपर बाजार, बरेच बार आहेत. संध्याकाळपासून येथे अंडा भुर्जी व फिश फ्राय या स्ट्रीट फूडचे स्टॉल्स लागतात. त्यामुळे, अवैध पार्किगची मोठी गर्दी होते. शिवाय, मद्यपींचा अधामधात धिंगाणाही असतो.
.....................