नागपूर : अनेक एटीएममध्ये रक्कम नसल्यामुळे गरजू नागरिकांची रविवारी मोठी गैरसोय झाली. रक्कम काढण्यासाठी अनेक जण इकडून तिकडे धावपळ करीत असल्याचे चित्र शहरातील अनेक एटीएमसमोर बघायला मिळाले.गुरुवारी, शुक्रवारी होळीमुळे तसेच शनिवारी बँका अर्धवेळ असल्यामुळे खातेधारकांनी बँकात जाण्याचे टाळले. अनेकांनी आपली आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी एटीएमकडे धाव घेतल्यामुळे अनेक बँकांच्या एटीएममधील रक्कम शनिवारी संपली. शनिवारी अर्धवेळ आणि रविवारी सुटी असल्यामुळे अनेक बँकांमधून एटीएममध्ये रक्कम पोहोचली नाही. परिणामी अनेक एटीएम रिकाम होते. इकडे वारंवार प्रयत्न करून एटीएममधून रक्कमच निघत नव्हती. त्यामुळे अनेक जण आपले एटीएम कार्ड घेऊन या सेंटरवरून त्या सेंटरकडे धावपळ करीत होते. काही एटीएममध्ये रक्कम होती. मात्र, त्यात दुसऱ्या बँकांचे कार्ड स्वीकारले जात नसल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना ‘रिकाम्या एटीएम’चा मोठा फटका बसला. गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, जरीपटका, सीताबर्डीसह अनेक भागातील एटीएमसमोर गर्दी होती. मात्र, त्यातून रक्कम निघत नसल्यामुळे अनेक जण त्रागा व्यक्त करीत होते. सोमवारी सकाळी बँकेकडून रक्कम आल्यानंतरच एटीएम सुरू होईल, असे सुरक्षा रक्षक सांगत होते. (प्रतिनिधी)
एटीएममध्ये ठणठणाट
By admin | Updated: March 9, 2015 01:56 IST