नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुन्हा एकदा एसटी बसेसचे प्रवासी घटले आहेत. एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशांना बसविण्यात येत असल्यामुळे उत्पन्नही ५० टक्के कमी झाले अहे. लॉकडाऊनमध्ये बसेसच्या संचालनासाठी अर्धेच चालक आणि वाहक कामावर उपस्थित राहणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळात एसटी बसेस ५० टक्के क्षमतेने चालविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. याबाबत नागपूर विभागाचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी सांगितले की, ५० टक्के क्षमतेने बसेस चालविण्यात येणार असल्यामुळे बसस्थानकावर पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे पर्यवेक्षक प्रवाशांची जाण्याची व्यवस्था संबंधित मार्गावरील बसमध्ये करणार आहेत. परंतु प्रवाशांची संख्या अतिशय कमी झाल्यामुळे अधिक बसेस चालविणे शक्य होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाच्या काळात डिझेलचे दरही वाढल्यामुळे एसटी बसेसचे संचालन करताना अनेक अडचणी येत आहेत.
............
गणेशपेठ स्थानकातून ८०० फेऱ्या रद्द
‘रविवारी गणेशपेठ बसस्थानकावर प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. बसस्थानकावरून दररोज ११०० फेऱ्या सोडण्यात येतात. परंतु प्रवासीच नसल्यामुळे केवळ ३०० फेऱ्या सोडण्यात आल्या असून ८०० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.’
-अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार
..............