प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी घेतली लाचरामटेक : प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी एका विद्यार्थ्यांकडून हजार रुपयाच्या लाचेची रक्कम स्वीकारताना शिक्षकास अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास रामटेक येथील समर्थ विद्यालयात केली. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. प्रशांत राम येळणे (५०, रा. उल्हासनगर, मानेवाडा रोड, नागपूर) असे अटकेतील लाचखोर शिक्षकाचे नाव आहे. रामटेकच्या समर्थ विद्यालयात तो एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. सध्या या अभ्यासक्रमाच्या बारावीच्या एईटीमध्ये २२ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्या विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण होण्याएवढे गुण देणे, गैरहजर विद्यार्थ्यांची हजेरी लावणे यासाठी तो विद्यार्थ्यांकडून हजार, पाचशे रुपये घ्यायचा. यासोबतच पैसे न देणाऱ्या विद्यार्थ्यांना दमदाटी करणे, अनुत्तीर्ण करण्याची धमकी देणे असा प्रकार सुरू होता.याबाबत मनसर येथील रहिवासी असलेल्या या विद्यालयातील एका विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला टोल फ्री क्रमांकावरून सूचना दिली. त्यानुसार गुरुवारी सापळा रचला. शाळा परिसरात १०० रुपयांच्या १० नोटा घेत असताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही माहिती रामटेकमध्ये पसरताच अनेकांनी शाळा परिसरात गर्दी केली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचा गॅरेज मेन्टनन्स व व्हेईकल या विषयाचा पेपर असल्याने शाळा परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी होते. त्यांच्यासमोर हा प्रकार घडला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम बावनकर, वासुदेव डाबरे, विलास खनके, संतोष फुंडकर, अजय यादव, संतोष मिश्रा यांनी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)
गुरुजी, तुम्हीसुद्धा!
By admin | Updated: January 9, 2015 00:50 IST