चिपळूण : मूर्तवडे कझर येथे बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्रीसाठी आणणाऱ्या चार आरोपींना घेऊन पोलिसांनी मंगळवारी घटनास्थळी भेट दिली. संशयित सुधाकर धाकटू नेवरेकर याच्या घरातून वन अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या आठ नखांसह बंदूक व सुरा जप्त केला. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश मते, हवालदार गणेश नाले, गगनेश पटेकर, सुशांत कांबळे यांनी सापळा रचून अमोल पालकर, मुनावर खान व सुनील जड्याळ, सुधाकर नेवरेकर यांना रंगेहात पकडले होते. या आरोपींना दि. २१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी वनखात्याचे परिक्षेत्र वनअधिकारी गोविंद कोल्हे, फिरत्या पथकाचे परिक्षेत्र वनअधिकारी शहाजी पाटील, वनपालआर. बी. पताडे, वनरक्षक उमेश आकाडे, तौफिक मुल्ला, महादेव पाटील, सूरज तेली, सुभाष नाईक, जितेंद्र बारशिंगे यांच्या पथकाने तपासाला गती दिली. मंगळवारी आरोपींसह अधिकारी मूर्तवडे येथे घटनास्थळी तपासासाठी गेले होते. आरोपीच्या घरात त्यांना बिबट्यांची आठ नखे, बंदूक व लोखंडी सुरा सापडला. ही बंदूक नेवरेकर याने स्वत: बनविली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा बिबट्या नेवरेकर याने मारला असल्याची कबुली त्याने यापूर्वी दिली आहे. गावापासून दीड कि.मी. अंतरावर जंगलात नेवरेकर याची आंबा, काजूची बाग आहे. रात्री साडेआठच्या दरम्यान त्याने बिबट्याला गोळ्या घातल्या व घाबरून तो घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तो घटनास्थळी गेला व त्याने शोध घेतला असता एका झाडाखाली बिबट्या मरून पडलेला आढळला. तेथून ३०० मीटर अंतरावर बागेत त्याने बिबट्याचे कातडे काढले व मांस तेथे असणाऱ्या दरीत फेकून दिले. मंगळवारी आरोपी नेवरेकर याने बिबट्याला मारल्याची जागा अधिकाऱ्यांना दाखवली. बिबट्याला मारण्यासाठी नेवरेकरबरोबर आणखी काही लोक असण्याची शक्यता असून, वनखात्याचे अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती. (प्रतिनिधी)आणखी दहा नखांचा शोध सुरूबिबट्या किंवा वाघाच्या पुढील दोन पायांना पाच-पाच, तर मागील दोन पायांना चार-चार अशी एकूण १८ नखे असतात. त्यापैकी आठ नखे वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सापडली आहेत. उर्वरित दहा नखांचा शोध अद्याप सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत पेढांबे अलोरे येथे आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी बिबट्याचे कातडे सापडले होते व आता हे मूर्तवडे येथील दुसरे कातडे आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागात राजरोस बिबट्यांची शिकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
बिबट्याच्या आठ नखांसह बंदूक जप्त
By admin | Updated: November 18, 2015 00:06 IST