अशोक चव्हाण : संघर्ष यात्रेत भाजपवर विरोधी पक्षांचा हल्लाबोल नागपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न भाजपा सरकारला बिलकुल समजत नाहीत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने सत्तेवर येताच मात्र कर्जमाफी मिळणार नाही, असा पावित्रा घेतला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे भाजप-शिवसेनेचे हे सरकार आता फार काळ टिकणार नाही, ते लवकरच कोसळेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुटीबोरी येथे केला. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष आणि एमआयएम या पक्षांनी संयुक्तपणे चांदा (चंद्रपूर) ते बांदा (पनवेल) पर्यंत संयुक्त संघर्ष यात्रा काढली आहे. चंद्रपूरपासून सुरू झालेली ही संघर्ष यात्रा गुरुवारी दुपारी १ वाजता बुटीबोरी येथे पेहोचली. बुटीबोरी चौकात जाहीर सभा झाली. तीत खा. अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, समाजवादी पार्टीचे नेते आ. अबू आझमी, शेकापचे आ. धैर्यशील पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, आ. गोपालदास अग्रवाल, अनिल देशमुख, रमेश बंग, मधुकर चव्हाण, आ. सुनील केदार, बसवराज पाटील, विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, शहराध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश सचिव मुजीब पठाण, अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, प्रा. बबनराव तायवाडे, नाना गावंडे, राजाभाऊ टांकसाळे, कुंदा राऊत, बंटी शेळके, हुकुमचंद आमधरे, माया चौरे, बाबा आष्टनकर, सुधीर देवतळे, आदी उपस्थित होते. खा. अशोक चव्हाण म्हणाले, गरीब सामान्यांना न्याय देण्यासाठी सरकार असते. परंतु श्रीमंतांच्या भाजप सरकारने सामान्यांना निराशाच दिली. भाजपच्या काळात गेल्या दोन वर्षात नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ती अजूनही सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही ही संघर्ष यात्रा काढली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून ही संघर्ष यात्रा आहे. तेव्हा तुम्ही (शेतकऱ्यांनी) आम्हाला हिंमत द्या, लाठ्या-काठ्या खायला आम्ही तयार आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी जयंत पाटील, कुंदा राऊत आदींनी मार्गदर्शन केले. राजेंद्र मुळक यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)
ंकर्जमाफी न देणारे सरकार कोसळेल
By admin | Updated: March 31, 2017 03:04 IST