नागपूर : कोविड-१९ ची परिस्थिती नियंत्रणात येताच शासनाने शाळा व महाविद्यालये सुरू केली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांच्या राहण्याची सोय व्हावी, यासाठी शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी घेतला आहे.
देशात कोविड-१९ ची महाभयंकर परिस्थिती उद्भवल्यामुळे सर्व देशभर शासनाद्वारे लॉकडाऊन केल्या गेले होते. त्यामुळे गेल्या १० महिन्यापासून समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बरेचशी शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा या कोविड केअर सेंटर म्हणून देण्यात आल्या होत्या.
सद्यस्थितीत शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. समाजकल्याण विभागाची वसतिगृहे ही ग्रामीण व शहरी भागातील गरीब व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नागपूर विभागातील सर्व निवासी शाळा वसतिगृहे सुरू करण्यात येत आहेत. वसतिगृहे सुरू करण्याआधी सर्व वसतिगृहाच्या स्वच्छतेच्या बाबीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यासाठी थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना वसतिगृहात पाठवावे तसेच ज्यांना वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी नव्यावे अर्ज करावे, असे आवाहनही प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.