लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरासह तालुक्यात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. रुग्णांसाेबतच मृत्यूदर वाढत असल्याने तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवायला सुरुवात झाल्याने यातून मार्ग काढण्यासाठी सावनेर नगर परिषद प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जाेपासत शहरातील शासकीय रुग्णालयाला संपूर्ण कीटसह ऑक्सिजनचे १० सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे आराेग्य व्यवस्थेला थाेडे बळ व रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
काेराेना रुग्ण संख्या वाढत असल्याने शासकीय आराेग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. त्यातच त्यांना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या काही साहित्याची कमतरता जाणवायला सुरुवात झाल्याने शहरातील शासकीय रुग्णालयाला १० ऑक्सिजन सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती नगराध्यक्ष रेखा माेवाडे व उपाध्यक्ष ॲड. अरविंद लाेधी यांनी संयुक्तरीत्या दिली. या साधनांचा उपयाेग शेवटी सामान्य जनतेलाच हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील काेराेना रुग्णांची साेय व्हावी म्हणून सावनेर शहरातील शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तिथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, औषधांसह आवश्यक साधने उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती सावनेर येथील शासकीय आराेग्य केंद्राचे प्रपाठक डाॅ. पवन मेश्राम यांनी दिली. या ठिकाणी डाॅ. संदीप गुजर, डाॅ. हरीश बरय्या, डॉ. ईशरत, डॉ. राम वरठी व त्यांचे सहकारी गंभीर रुग्णांना सेवा प्रदान करीत असून, अतिगंभीर रुग्णांना नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटल व मेयाे रुग्णालयात हलवण्याची व्यवस्थाही केली जात आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष रेखा माेवाडे, उपाध्यक्ष ॲड. अरविंद लाेधी, घनश्याम तुर्के, संतोष बंडावर, शैलेश वाहणे, गणेश चांदेकर, अभियंता अमोल कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.