आठ दिवसाचा अवधी अन्यथा कारवाई
भिवापूर : राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळालेल्या नागपूर-गडचिरोली मार्गाचे नागपूर ते उमरेड चौपदरीकरणाचे काम पूर्णाकृती घेत आहे. मात्र त्यापुढे मंजूर असलेले उमरेड-भिवापूर-नागभीड दुपदरीकरणाचे काम थंडबस्त्यात आहे. दरम्यान, शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गाच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत बांधकामांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने नुकतीच नोटीस बजावली असून, आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे उमरेड-नागभीड दुपदरीकरणाच्या निर्मितीची आशा बळावली आहे.
नागपूर ते उमरेड चौपदरीकरणाप्रमाणे उमरेड-भिवापूर-नागभीड दुपदरीकरणास तात्काळ सुरुवात करावी, याबाबत लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित केले आहे. दुपदरीकरणासंदर्भात भूमिअधिग्रहण व इतर आवश्यक ती कार्यवाही बहुतांश पूर्ण झालेली आहे. त्यामुळे बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून निर्मितीच्या कामास तात्काळ सुरुवात करण्याची मागणी माजी आ. सुधीर पारवे यांनी आठवडाभरापूर्वी केली होती. शुक्रवारी राष्ट्रीय मार्गावरील अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस मिळाली.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गाच्या दुतर्फा व्यापारी व दुकाने थाटलेली आहेत. यात मार्गाच्या एका बाजूला कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळे असून, त्यापुढे अनेकांनी टिनांचे शेड टाकले. शहरातून जाणाऱ्या दुपदरी मार्गाच्या निर्मितीत यातील बहूतांश दुकाने तावडीत सापडणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. ३ सहायक अभियंता यांच्या स्वाक्षरीची नोटीस शहरातील संबंधित दुकानदारांना मिळाली आहे. यात सदर नोटीस मिळताच संबंधितांनी ‘संबंधित जागेची स्वमालकी असल्याबाबत’ आवश्यक ती कागदपत्रे आठ दिवसाच्या आत सादर करावीत, अन्यथा नॅशनल हायवे ॲक्ट २००२ नुसार अनधिकृत बांधकाम काढण्यात येईल, असे या नोटीसमध्ये नमूद केलेले आहे. त्यामुळे उमरेड-नागभीड दुपदरीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होण्याची आशा बळावली आहे.
वेळ आणि पैशाची बचत
एरवी भिवापूर ते नागपूर या अरुंद व खड्डेयुक्त प्रवासात नागरिकांना दोन तास लागतात. त्यातही अपघाताची भीती अधिक असते. मात्र हा मार्ग चौपदरी व दुपदरी होताच भिवापूर येथून तासाभरात नागपूर गाठता येणार आहे. त्यामुळे पैसा व वेळेची बचत होणार आहे. हा मार्ग तात्काळ पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा देवराव जगताप, हिमांशु अग्रवाल, अमन अरोरा, अमोल वारजूरकर, धनंजय चौधरी, भूषण नागोसे आदींनी केली आहे.