लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसीतील वादग्रस्त जमिनीच्या कब्जा प्रकरणातील महिलेच्या घराला गुंड दुर्गेश पसेरकर आणि त्याच्या साथीदारांनी आग लावली. आग लावण्यापूर्वी आरोपींनी वृद्ध महिलेला चाकूच्या धाकावर मारहाण मारहाण करून दागिने हिसकावून नेले. घरातील साहित्याची तोडफोडही केली. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास हे प्रकरण घडले. प्रमिला गेडाम यांच्या मुलीचा भाजप नेता मुन्ना यादवशी जमिनीवरुन वाद सुरू आहे. त्या प्रकरणात यादवविरोधात पोलिसांत गुन्हादेखील दाखल झाला आहे. यादवच्या अटकेची मागणी होत असताना ही आग लावण्यात आल्याने राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
प्रमिला विनायक गेडाम (वय ७०) असे तक्रारदार वृद्धेचे नाव आहे. त्यांच्या मुलीने वैशालीनगरातील एक भूखंड घेतला होता. तो व्यवहार वादग्रस्त झाल्याने, गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास आरोपी पसेरकर त्याच्या साथीदारासह गेडाम यांच्या घरी आला. वादग्रस्त भूखंडाच्या व्यवहारावरून वृद्ध गेडाम यांच्याशी भांडण करून आरोपीने घरातील टीव्ही, तसेच अन्य साहित्याची तोडफोड केली. गेडाम यांनी विरोध केला असता त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि डोरले तसेच रोख १५ हजार रुपये असा एकूण ४२ हजारांचा ऐवज हिसकावून घेतला. त्यानंतर, घराला आग लावून आरोपी पळून गेला. प्रकरणाची माहिती कळताच, सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. दरम्यान, घराची आग विझविण्यात आली होती. गेडाम यांची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर, पोलिसांनी आरोपी पसेरकर आणि साथीदारावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. जमीन कब्जा प्रकरणात मुन्ना यादव, पंजू तोतवानी यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
----
पसेरकरविरोधात अनेक गुन्हे
आरोपी पसेरकर हा कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे ईमामवाडा, तसेच अन्य पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणाला एमआयडीसीतील भूखंडाच्या वादग्रस्त व्यवहाराची जोड असल्याचे लक्षात आल्यानंतर, वरिष्ठांनी कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पसेरकर गेडाम यांच्याकडे जात होता, अशी माहिती समोर आली असून आरोपीला अटक केल्यानंतरच या प्रकरणामागची पार्श्वभूमी पुढे येईल, असे ठाणेदार सागर यांनी या संबंधाने ‘लोकमत’ला सांगितले.
----