नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली. ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखविले; परंतु सत्तेवर येताच सर्व आश्वासने फोल ठरली. गेल्या १० महिन्यांत केंद्र सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती केली नाही. केवळ उद्योगपतींना लाभ पोहोचविणारी ध्येयधोरणेच आखली जात आहेत, त्यामुळे अच्छे दिन केवळ उद्योगपतींचेच आले आहेत, अशी टीका बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंह यांनी रविवारी येथे केली. बहुजन समाज पार्टीतर्फे येत्या २ मे रोजी भूमी अधिग्रहण विधेयकाच्या विरोधात देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपुरात मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन होईल. त्या आंदोलनाच्या तयारीसाठी पक्षाच्या विदर्भस्तरीय मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी विदर्भ साहित्य संघाचे सभागृह झाशी राणी चौक सीताबर्डी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, उपाध्यक्ष कृष्णा बेले प्रामुख्याने उपस्थित होते. खा. वीरसिंह म्हणाले, एकीकडे देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि आपले पंतप्रधान विदेशवारीत मग्न आहेत. देशातील जनतेला भाजपाचा खरा चेहरा आता दिसून आला आहे. त्यामुळेच दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाला सपाटून मारा बसला. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारालासुद्धा पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येसुद्धा भाजपाची अशीच गत होणार असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी वाडी नगर परिषदेतून निवडून आलेल्या बसपा उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. नागोराव जयकर यांनी प्रास्ताविक केले. भाऊ गोंडाणे यांनी संचालन केले. या बैठकीला विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अच्छे दिन केवळ उद्योगपतींचेच
By admin | Updated: April 27, 2015 02:28 IST