नागपूर : ते आले, बसले, बोलले आणि निघून गेले. ते गेल्यानंतर मात्र सराफाच्या शोरूममध्ये एकच खळबळ उडाली. कारण त्यांनी दिवसाढवळ्या अनेकांसमोर हातचलाखी दाखवून सराफा व्यावसायिकाला १ लाख १२ हजाराचा फटका दिला होता.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतवारीच्या सराफा मार्केटमध्ये सोमवारी दुपारी २ वाजून ५८ मिनिटांनी ही घटना घडली.
कोठारी ज्वेलर्समध्ये एक महिला आणि एक तरुण दुपारी २.५० च्या सुमारास आले. सोनसाखळी विकत घ्यायची आहे, असे सांगून त्यांनी अनेक सोनसाखळ्या बघितल्या. विशेष म्हणजे, या शोरूममध्ये जागोजागी सीसीटीव्ही आहेत. प्रत्येक ग्राहकावर नजर ठेवता येईल, यासाठी ती व्यवस्था आहे. तरीसुद्धा या दोघांनी बेमालूमपणे तेथून सोन्याची साखळी लांबविली. ते निघून गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला आणि दुकानात एकच खळबळ उडाली. कोठारी यांच्यावतीने शर्मा यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलीस आता त्या दोघांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, या चोरीचे चित्रण सराफा दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.