धीरज शुक्ला/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील गोधनी स्टेशनवरील निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे प्लॅटफॉर्मला भगदाड पडले आहे. त्यामुळे पार्सल वाहनांसोबतच प्रवाशांनाही त्रास होत आहे. भगदाड पडल्याने संपूर्ण प्लॅटफॉर्मचे सौंदर्य नष्ट झाले आहे. सिमेंटने ते भगदाड लपविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
काही रेल्वे प्रवाशांच्या तक्रारीनंतर लोकमतची चमू घटनास्थळावर पोहोचली. निरीक्षण केले असता, नागपूर रेल्वेस्थानकापासून केवळ ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोधनी प्लॅटफॉर्मच्या निकृष्ट निर्माणकार्याची स्थिती उघड झाली. येथे प्लॅटफॉर्मला भगदाड पडण्यासोबतच पिण्याच्या पाण्याचे नळ लाकडी काठ्यांनी बंद करण्यात आली आहेत. सर्वत्र रेलिंग तुटलेल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार हे प्लॅटफॉर्म ३६० मीटर लांब असून, ज्युनिक असोसिएट नावाच्या कंपनीने २०१८ मध्ये हे बांधकाम केले. वायरिंगसाठी प्लॅटफॉर्मच्या मधातूनच एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत पीव्हीसी पाईप वरूनच टाकण्यात आले आहेत. काही दिवसात यात भगदाड पडले असून, प्लॅटफॉर्मवरील फरशा तुटायला लागल्या आहेत. त्यामुळे पाईप बाहेर दिसायला लागले आहेत.
कामाचा खर्च ४० लाख?
मंडळातील कनिष्ठ अधिकारी यासंबंधात बोलण्यास टाळाटाळ करीत आहेत. कुणी या कामासाठी ८० लाख तर कुणी ४० लाख रुपये लागल्याचे सांगत आहेत. खरे तर या कामाची गुणवत्ता तपासण्याचे काम सहायक मंडळ अभियंता (उत्तर) यांचे आहे. परंतु, ते कर्तव्यापासून लांब असल्याचे दिसते. मध्य रेल्वे नागपूर मंडळातून मिळालेल्या माहितीनुसार इथे ४० लाख रुपयाचे निर्माणकार्य झाले आहे.
टाईल्स उखडून पडल्या
ट्रेनमधून उतरताना किंवा चढताना प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्मवर टाईल्स लावण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी या टाईल्स उखडून पडल्या आहेत. काही ठिकाणी तर स्थिती आणखीनच गंभीर आहे. प्रवासी गाड्यांची संख्या वाढण्यासोबतच या स्टेशनवर प्रवाशांची संख्याही वाढणार आहे. तेव्हा मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
पाईप टाकण्याचे कारण स्पष्ट नाही
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्लॅटफॉर्मवर ३६० मीटर पाईप टाकण्यात आला आहे. यातून केबल टाकायचे होते. मात्र, पाईप टाकल्यापासून केबल टाकलेच गेले नाही. निर्माणानंतर प्लॅटफॉर्मच्या मागून केबल टाकण्यात आले. हे पाईप वरवर टाकले गेल्याने काही ठिकाणी ते तुटल्या अवस्थेत आहेत.
.........