Give Power backup to Lift of Nagpur District Court: Application in High Court | नागपूर जिल्हा न्यायालयातील लिफ्टस्ना पॉवर बॅकअप द्या : हायकोर्टात अर्ज
नागपूर जिल्हा न्यायालयातील लिफ्टस्ना पॉवर बॅकअप द्या : हायकोर्टात अर्ज

ठळक मुद्देडॉक्टर, रुग्णवाहिका इत्यादी मागण्याही केल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा न्यायालयामध्ये लिफ्टस्ना पॉवर बॅकअपसह विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी महासचिव मनोज साबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष गुरुवारी सुनावणी होणार आहे.
मंगळवारी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जिल्हा न्यायालयातील लिफ्टस् बंद पडल्या होत्या. एका लिफ्टमध्ये अडकलेल्या शाहीन शहा, आफरीन अझमत व सुधा सहारे या तीन महिला वकील बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांची प्रकृती अत्यंत खराब झाली होती. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे त्या बचावल्या. भविष्यात पुन्हा अशा अकस्मात घटना घडू नये व घडल्यास आवश्यक सुविधा उपलब्ध राहाव्या याकरिता हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयातील लिफ्टस्ना पॉवर बॅकअप देण्यात यावे, वैद्यकीय केंद्र स्थापन करून त्या ठिकाणी डॉक्टर व सहयोगी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, वैद्यकीय केंद्राला रुग्णवाहिका, स्ट्रेचर व व्हील चेअर उपलब्ध करून देण्यात याव्यात, आवश्यक ठिकाणी अग्निशमन यंत्रे बसविण्यात यावीत व जिल्हा न्यायालयासाठी स्वतंत्र अग्निशमन पथक नेमण्यात यावे अशा साबळे यांच्या मागण्या असून यासंदर्भात सरकारला आदेश देण्याची विनंती या अर्जाद्वारे न्यायालयाला करण्यात आली आहे.
पार्किंग ठरतो अडथळा
सध्या जिल्हा न्यायालयात पार्किंगकरिता अपुरी जागा आहे. त्यामुळे शक्य तेथे वाहने उभी ठेवली जातात. परिणामी, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन आत आणता येत नाही. याच कारणाने मंगळवारी महिला वकिलांना उचलून बाहेर न्यावे लागले. ही बाब लक्षात घेता पक्षकार व आगंतुकांना न्यायालय परिसरात वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात यावी असेही साबळे यांचे म्हणणे आहे. जिल्हा न्यायालयातील पार्किंगवर उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती. तसेच, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन आत आणता येईल एवढी जागा मोकळी ठेवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर काही दिवस जागा मोकळी ठेवण्यात आली. आता परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.
दोन व्हीलचेअर्स भेट 


मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी मंगळवारची घटना गंभीरतेने घेऊन जिल्हा न्यायालयाला स्वत:तर्फे दोन व्हीलचेअर्स भेट दिल्या. याप्रसंगी जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा, सचिव अ‍ॅड. नितीन देशमुख, अ‍ॅड. पारिजात पांडे, अ‍ॅड. दीपक कोल्हे, अ‍ॅड. जयंत अलोणी, अ‍ॅड. अभय जिकार, अ‍ॅड. वर्षा आगलावे, अ‍ॅड. माधुरी मोटघरे, अ‍ॅड. विजय पेटकर, अ‍ॅड. अनिल गुल्हाने, अ‍ॅड. परिक्षित मोहिते, अ‍ॅड. अमित चन्ने, अ‍ॅड. रुबी सिंग, अ‍ॅड. शबाना खान, अ‍ॅड. बाबा भांडेकर आदी उपस्थित होते.


Web Title: Give Power backup to Lift of Nagpur District Court: Application in High Court
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.