काटोल : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची व ज्या योजनेचा प्रत्येक गावातील शेतकरी लाभ घेऊ शकतो अशी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना होय. या योजनेत अनेक प्रकारचे लाभ शेतकरी घेऊ शकतो. परंतु या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तेव्हाच होईल जेव्हा शेतात राबणाऱ्या मजुरांना या योजनेत समाविष्ट केले जाईल. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होईल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे शेतमजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत शेतातील कामे द्या, अशी मागणी प्रगतिशील शेतकरी निरंजन राऊत यांनी केली आहे. काटोल तालुक्यात गत दोन वर्षापासून शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यंदा तरी शेतपीक चांगले होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु सोयाबीन अगदी सुरुवातीलाच किडीने फस्त केले. संत्रा, मोसंबी पिकाला गळू लागल्याने मोठे नुकसान झाले. कपाशीला बोंडअळीचा फटका बसतो आहे. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानभरपाईची घोषणा केली जाते. कधी कर्जमाफी दिली जाते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला याचा फायदा होताना दिसत नाही. रोजगार हमी योजनेंतर्गतसुद्धा असाच काहीसा प्रकार सुरू आहे. यात आता सुधारणा होणे गरजेचे आहे.
शेतमजुरांना रोहयोंतर्गत शेतातील कामे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST