जे.पी.डांगे : चौथ्या वित्त आयोगाची बैठकनागपूर: प्रत्येक नागरिकाला दिवसाला १३० ते १३५ लिटर पाण्याची आवश्यकता असते व तेवढे पाणी नगरपालिका आणि नगर पंचायतींनी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी येथे केले.डांगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. त्यात ते बोलत होते. नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी नगर पालिका व नगर पंचायतींना आवश्यक असलेल्या निधीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. स्थानिक नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी व सुविधांवर होणारा खर्च व त्यांना मिळणारे उत्पन्न, शासनाकडून मिळणारे अनुदान तसेच विविध संस्थांकडून घेतलेले कर्ज याचा ताळमेळ घालून स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनुदानाची मागणी शासनाकडे करावी,अशी सूचनाही त्यांनी केली. सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीज, शिक्षण तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन आदीसाठी होणाऱ्या खर्चाचाही शासकीय अनुदानात समावेश आहे.कर्मचारी नियमित करणे, कराचे उत्पन्न वाढविणे, अनुदान एकरकमी देणे, शाळांची कामे प्राधान्याने करणे, विविध खटल्यांसाठी वकिलांची नियुक्ती करणे, आदी सूचना डांगे यांनी यावेळी केल्या.बैठकीला रामटेक, कामठी, रामटेक, काटोल, नरखेड,मोवाड, कळमेश्वर, सावनेर, खापा आणि मोहपा नगरपालिका तसेच महादुला आणि मौदा नगर पंचायतीचे अध्यक्ष व उपजिल्हाधिकारी प्रकाश शर्मा बैठकीला उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रत्येकाला किमान गरजेइतके पाणी द्या!
By admin | Updated: November 26, 2014 01:06 IST