नागपूर : आपल्या आईवडिलांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून कुंजीलालपेठ येथील एका १५ वर्षीय मुलीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. आरोपी आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयात सादर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. रितिका बौद्धरत्न कांबळे (१५) रा. कुंजीलाल पेठ गल्ली नं. ३ मानवता शोच्या मागे असे मृत मुलीचे नाव आहे. ती मानवता शाळेत दहावीला शिकत होती. रितिकाने २६ आॅगस्ट रोजी दुपारी स्वत:च्या अंगावर रॉकेलचे तेल ओतून जाळून घेतले होते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान रितिकाचा १८ वर्षीय भाऊ शुभम याने सांगितले की, वडील बौद्धरत्न, आई अर्चना आणि आजी ताराबाई कांबळे हे रितिकाला नेहमीच त्रास देत होते. घरातील काम करण्यासाठी तिच्य मागे नेहमी तगादा लावला जात होता. मारहाण करून उपाशी ठेवले जात होते. कुणासोबत तिला बोलू दिले जात नव्हते. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस येताचा अजनी पोलिसांनी मृत मुलीचे वडील बौद्धरत्न, आई अर्चना व आजी ताराबाई यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयासमोर सादर केले असता आरोपींची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. बौद्धरत्न हा आॅटोचालक असून त्याने ७ लग्न केल्याचे सांगितले जाते. रितिकाला शुभमशिवाय एक लहान भाऊसुद्धा आहे. (प्रतिनिधी)
त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या
By admin | Updated: August 30, 2014 02:48 IST