नागपूर : मेट्रो रेल्वे स्थानक ते विमानतळ टर्मिनलपर्यंतचा मार्ग वातानुकूलित करण्यासह लगेज व फीडर सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एनएमआरसीएल) ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात उपस्थितांनी केली. तिसऱ्या ‘लोकसंवाद’चे आयोजन विमानतळ परिसरात सोमवारी करण्यात आले. मेट्रो रेल्वेचा प्राथमिक ते अखेरच्या टप्प्यादरम्यान उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती लोकांना करून देण्याचा ‘लोकसंवाद’चा मुख्य उद्देश आहे. ‘एनएमआरसीएल’चे उपमहाव्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर यांनी सादरीकरणाद्वारे मेट्रो प्रकल्पाची माहिती दिली आणि उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. मेट्रोच्या अन्य स्टेशनच्या तुलनेत विमानतळ स्टेशन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. येथे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर आहे.प्रवाशांना सुविधा पुरविताना मेट्रो स्टेशन ते विमानतळापर्यंत लगेज सुविधा देण्याचा महत्त्वाचा मुद्दा विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित केला. प्रवाशांसाठी मेट्रो स्टेशन ते टर्मिनलपर्यंत वातानुकूलित स्वयंचलित मार्ग तयार करण्याची मागणी केली. आमदार आणि एएआयच्या प्रतिनिधींनी मेट्रो स्टेशनवर योग्य पार्किंग सुविधेची मागणी केली. तर काहींनी मेट्रो, फीडर बस व पार्किंग शुल्कासाठी एकत्रित तिकीट यंत्रणा असावी, यावर भर दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिहान इंडिया लिमिटेडचे आबदी रुही होते. यावेळी सीआयएसएफचे गुरजितसिंग, एअर इंडियाचे मुकेश यांच्यासह विविध विमान, भारतीय हवामान खाते, अग्निशमन सेवा, सीआयएसएफ, मिहान इंडिया आदींचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रेल्वे स्थानक ते विमानतळ मार्ग वातानुकूलित करा
By admin | Updated: July 14, 2015 03:11 IST