मनपाचा भांडेवाडीत ३६४. ८५ कोटींचा प्रकल्प नागपूर : भांडेवाडी येथील डम्पिंगयार्डची क्षमता विचारात घेता भविष्यात येथे कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण जाणार आहे. याचा विचार करता महापालिकेने येथील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३६४.८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. नागपूर शहरातून दररोज १००० ते ११०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. शहराचा वाढता पसारा पाहता निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. एवढया कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा एक मोठा प्रश्न महापालिकेमोर आहे. यातील २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती. परंतु हंजर बायोटेक एनर्जीचा हा प्रकल्प मागील काही वर्षांपासून बंद पडलेला आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया न करता तो भांडेवाडी येथे साठविला जातो. कचरा साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता वीज प्रकल्पासाठी यातील कचरा वापरून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.(प्रतिनिधी)
कचऱ्यापासून वीज निर्मिती
By admin | Updated: December 23, 2016 01:30 IST