लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या तीन झोनमधील कचरा संकलन मंगळवारी ठप्प होते. यात गांधीबाग, सतरंजीपुरा व लकडगंज झोनचा समावेश आहे. प्रशासनाने मात्र सकाळी ११ पासून कचरा संकलन सुरळीत सुरू झाल्याचा दावा केला आहे. वास्तविक काही मोजकीच वाहने दिसत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पारडी प्रभागातील अर्ध्याहून अधिक भागात बीव्हीजी कंपनीची कचरा संकलन करणारी वाहने येत नाही. यासंदर्भात नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी अनेकदा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, परंतु याची दखल घेतली नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी एकही गाडी निघू दिली नाही. भांडेवाडीत बीव्हीजीची वाहने उभी होती. यामुळे सकाळी १०.३० पर्यंत झोनमधील गाड्या उभ्या होत्या. समजून काढल्यानंतर परिस्थिती निवळली. परंतु मंगळवारी या झोनमधील बहुसंख्य भागातील कचरा संकलन ठप्प होते.