नागपूर : गणपती हनुमान मंदिर ट्रस्टतर्फे हनुमान मंदिर तलाव परिसर बाजारगाव येथे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी निमित्त आजपासून दोन दिवस गणेश आराधना धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ३० जानेवारी रोजी रात्री ७ ते १० या वेळेत डिगडोह पांडे येथील भजन मंडळातर्फे भजन होतील. ३१ रोजी सकाळी ९ ते ११.३० वाजता शीवा सवंगा येथील भजन मंडळातर्फे भजन होईल. सकाळी ११.३० वाजता महाआरती नंतर दहीकाला होईल. दुपारी १ ते ४ दरम्यान मान्यवरांचा सत्कार व प्रसाद वितरण होईल. याच वेळेत भजनसंध्या होईल. ट्रस्टचे अध्यक्ष नाना गावंडे व सचिव राजेंद्र घायवट यासाठी परिश्रम घेत आहेत.
बाजारगाव हे जैन मंदिरासाठी प्रसिद्ध असे गाव आहे. या मंदिरातील गणेश मूर्ती या सुमारे ३५० वर्षांपूर्वीच्या आहेत. राज्य सरकारने या धार्मिक स्थळाला ‘क’ वर्ग पर्यटन दर्जा दिला आहे. विभाग पुरातत्त्व विभागाने या परिसरातील मंदिरांचा विकास केलेला आहे. या तीर्थक्षेत्राचा आणखी विकास व्हावा अशी, या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. या पुरातन मंदिरात दरमहा संकष्ट चतुर्थीला गणेश आराधना व महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो नागपूर परिसरातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. समृद्ध असा बाजारगाव तलाव व सभोवताल टेकड्यांच्या रांगांवर नटलेली वनराई यामुळे या भागाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. गावंडे परिवाराने गत चार पिढ्यांपासून या तलावाचे जतन व संवर्धन केले आहे.