खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते पोत्यात भरून गांधीसागर तलावात फेकल्याचे प्रकरण गुन्हे शाखेने सोडवले आहे. पोलिसांनी खुनाचा मुख्य सूत्रधार ई-रिक्षा चालकास साथीदारासह अटक केली आहे.
गांधीसागर तलाव खून प्रकरण : ‘इलेक्ट्रिक कटर’ने कापला होता मृतदेह
ठळक मुद्देमृतदेह ई-रिक्षा चालकाचासाथीदार चालकासह दोघांना अटकशिवीगाळ व मारहाणीतून झाली हत्या
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते पोत्यात भरून गांधीसागर तलावात फेकल्याचे प्रकरण गुन्हे शाखेने सोडवले आहे. पोलिसांनी खुनाचा मुख्य सूत्रधार ई-रिक्षा चालकास साथीदारासह अटक केली आहे. ई-रिक्षात प्रवासी बसविण्यावरून त्यांच्यात शिवीगाळ व मारहाण झाल्यामुळे हत्या केल्याचे सांगितले जात आहे. सुधाकर रंगारी (४८) रा. आवळेनगर, जरीपटका असे मृताचे नाव आहे. तो सुद्धा ई-रिक्षा चालक होता. त्याचा मृतदेह इलेक्ट्रिक कटरने सात भागात कापून गांधीसागर तलावात फेकण्यात आला होता. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त नीलेश भरणे यांनी यासंबंधात माहिती दिली. राहुल पद्माकर भोतमांगे (२६) रा. बारसेनगर, राहुल ज्ञानेश्वर धापोडकर (२५) रा. तांडापेठ, अशी आरोपींची नावे आहे. महिनाभरानंतर हे प्रकरण सोडवण्यात पोलिसांना यश आले.गेल्या १० जुलै रोजी गांधीसागर तलावात पोत्यामध्ये बांधून असलेला डोके नसलेला एक मृतदेह सापडला. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरे पोते सापडले. त्यात मृतदेहाचे दुसरे अवयव होते. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे तुकडे करून ते तलावात फेकण्यात आले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यादिशेने तपास सुरू केला. पोलिसांनी कॉम्प्युटरच्या मदतीने मृतदेहाच्या चेहऱ्याशी अनेक फोटो मॅच करून पाहिले. या आधारावर बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात आला. यादरम्यान मृतदेह सुधाकर रंगारीचा असल्याचा संशय आला.सुधाकर ७ जुलै रोजी घरून निघाला होता. तेव्हापासून त्याचा काहीही पत्ता नव्हता. सुधाकर कमाल चौकातून ई-रिक्षा चालवीत होता. पोलिसांनी कमाल चौक, इंदोरा, पाचपावली, वैशालीनगर आदी परिसरातील ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुधाकर हा राहुल भोतमांगेसोबत जाताना दिसून आला. पोलिसांनी भोतमांगेला विचारपूस केली. त्याने सुधाकरबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले. त्याने पोलिसांना तपासात पूर्णपणे मदत करण्याचे आश्वासनही दिले. पोलिसांनी परिसरातील इतर ई-रिक्षाचालकांना विचारपूस केली.तेव्हा सुधाकरने भोतमांगेला धमकावल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी भोतमांगेची कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली. त्याने ७ जुलै रोजी वैशालीनगर गार्डनजवळ सुधाकरची हत्या केल्याची माहिती दिली. यानंतर साथीदारांच्या मदतीने मृतदेहपाचपावलीतील पिवळी मारबत परिसरातील एका घरात घेऊन गेला. तिथे इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने मृतदेहाचे सात तुकडे करून पोत्यामध्ये भरले आणि गांधीसागर तलावात फेकले. भोतमांगे पूर्वी फर्निचरचे काम करायचा. त्यामुळे त्याच्याकडे त्याच्या जावयाने दिलेले इलेक्ट्रिक कटर होते.गुप्त माहिती मिळविणाऱ्या यंत्रणेद्वारेच यशसध्याच्या हायटेक युगातही पोलिसांसाठी मानवीय माहिती अतिशय महत्त्वाची ठरते. या प्रकरणात याचा प्रत्यय आला. गुन्हे शाखेकडे मृत किंवा आरोपीचा कुठलाही पुरावा नव्हता. झोन-३चे पथक पहिल्या दिवसापासूनच याचा शोध घेत होते. त्यांनी जरीपटका-पाचपावली परिसरातील शेकडो लोकांची विचारपूस केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच पोलीस भोतमांगेपर्यंत पोहोचले. पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांच्या नेतृत्वात झोन-३ च्या पथकाचे हे तिसरे प्रकरण आहे. ज्याचा कुठलाही पुरावा नसताना खुनाचे प्रकरण सोडविण्यास पोलिसांना यश आले. यापूर्वी कळमनातील बालाघाट येथील रहिवासी राजू बंबरे याच्या खुनाचे रहस्यही असेच सोडवण्यात आले. यात ७५ हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले होते. यानंतर बॉबी माकन हत्याकांडही उघडकीस आणण्यात आले. त्यासाठी पोलीस पथकाला ८० हजार रुपये बक्षीस घोषित करण्यात आले आहे.शिवीगाळ-मारहाण केल्याने खूनखुनाचा मुख्य सूत्रधार राहुल भोतमांगे याचे म्हणणे आहे की, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्यामुळेच सुधाकरचा त्याने खून केला. त्याचे हे म्हणणे पोलिसांना सुरुवातीपासूनच पटले नव्हते. पोलिसांनी अनेक ई-रिक्षा चालकांना विचारणा केली, तेव्हा त्यांनीही सुधाकरच्या वर्तनाची पुष्टी केली. सुधाकर रागीट स्वभावाचा होता. लग्नाच्या सहा महिन्यानंतरच त्याला पत्नीनेही सोडले होते.
अशी केली हत्या हत्येचा मुख्य सूत्रधार राहुल भोतमांगे हा सुद्धा ई-रिक्षा चालक आहे. तो सुद्धा कमाल चौकातूनच ई-रिक्षा चालवतो. त्याच्यानुसार मृत सुधाकर हा नेहमीच शिवीगाळ करून त्याला मारहाण करायचा. त्याच्या ई-रिक्षात प्रवासी बसल्यास त्यांना बळजबरीने उतरवून आपल्या वाहनात बसवायचा. सुधाकर त्याला परिसरातून प्रवासी बसवण्यावरून नेहमीच जीवे मारण्याची धमकी द्यायचा. परिसरात त्याचा दबदबा असल्याने कुणी विरोध करीत नव्हते. दररोजची शिवीगाळ आणि मारहाणीमुळे भोतमांगे त्रस्त झाला होता. त्यामुळे सुधाकरला अद्दल घडविण्याची त्याने योजना आखली. योजनेनुसार ७ जुलै रोजी त्याची सुधाकरसोबत इंदोरा चौकात भेट झाली. त्याने सुधाकरसोबत खूप दारू प्याली. सुधाकरला खूप नशा झाल्याचे लक्षात येताच, त्याने त्याचा मित्र राहुल धापोडकरला मदतीसाठी बोलावून घेतले. तो सुधाकरला वैशालीनगर उद्यानाजवळील रेल्वे लाईनजवळ घेऊन गेला. तिथे त्याने पुन्हा दारू पाजली. तिथेही सुधाकरने राहुलला शिवीगाळ करीत थापड मारली. तेव्हा भोतमांगेने त्याला धक्का दिला. तो जमिनीवर पडताच दगडाने त्याचे डोके ठेचले. सुधाकरची ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर ठेवला. परंतु खूप वेळपर्यंत एकही रेल्वेगाडी न आल्याने मृतदेह खड्ड्यात ठेवला आणि भोतमांगे व धापोडकर दारू प्यायला गेले. दारू पिल्यानंतर भोतमांगेने मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. तो पूर्वी फर्निचरचे काम करीत होता. त्याच्याकडे त्याच्या जावयाने दिलेले इलेक्ट्रिक कटर होते. त्याने मदतीसाठी आपल्या दुसºया एका मित्रालाही बोलावून घेतले. तिघांनी मृतदेह ई-रिक्षात टाकून पिवळी मारबत परिसरातील एका घरी नेले. त्या घरी भोतमांगे पूर्वी भाड्याने राहत होता. त्याला त्या घरी कुणी राहत नसल्याचे माहीत होते. रात्री १२ वाजता भोतमांगेने साथीदारांच्या मदतीने इलेक्ट्रिक कटरने सुधाकरच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्याचे दोन्ही हात, पाय, डोके, पोट आणि जांघ असे ७ तुकडे केले. ते सर्व तुकडे दोन पोत्यांमध्ये भरून गांधीसागर तलावात फेकून दिले. भोतमांगेने दिलेली माहिती ऐकून पोलिसही हादरले. पोलीस त्याच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नरेंद्र हिवरे, एपीआय पंकज धाडगे योगेश चौधरी, पीएसआय नीलेश डोर्लीकर, एएसआय राजेंद्र बघेल, रफीक खान, अनिल दुबे, शैलेश पाटील, अरुण धर्मे, रामचंद्र कारेमोरे, अतुल दवंडे, श्याम कडू, प्रवीण गोरटे, दयाशंकर बिसांद्रे, राकेश यादव, टप्पूलाल चुटे, संदीप मावलकर, परवेज खान, राजू पोतदार, शेख फिरोज, शेख रफीक, सत्येंद्र यादव यांनी केली.
... तरीही झाला नाही विचलित खून केल्यानंतरही अतिशय क्रूरपणे मृताचे तुकडे केल्यानंतरही भोतमांगे क्षणभरही विचलित झाला नाही. पोलिसांनी सख्तीने विचारपूस केली तेव्हा त्याने टोनी नावाच्या युवकावर खून केल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी टोनीची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा टोनी हा घटनेच्या वेळी तुरुंगात असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांचा संशय भोतमांगेवर बळावला. यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच भोतमांगेने हत्येची कबुली दिली. या हत्येत सहभागी असलेल्या तिन्ही आरोपींची नावे राहुल आहेत.