कन्हान : जुगारातून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर दोन गटातील हाणामारीत झाले. यात गोळीबार करून तसेच तलवारींनी हल्ला चढवून एकाचा खून करण्यात आला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, पोलीस चौघांचा शोध घेत आहे. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेकोलि इंदर कॉलरी खाण क्रमांक - ६ येथे गुरुवारी रात्री घडली.शीतलसिंह ऊर्फ मिट्टू गोपालसिंह रा. कन्हान असे मृताचे तर, सन्नी गोपालसिंह रा. कन्हान असे गंभीर जखमीचे नाव आहे. शीतलसिंह व सन्नी हे दोघेही सख्खे भाऊ होत. सूरज गोमेकर, शरद गोमेकर, अमर गोमेकर, तिघेही रा. कामठी, भुरू ऊर्फ संदीप यादव रा. गोराबाजार कामठी व पिंटू जयस्वाल रा. कामठी कॉलरी, कन्हान, अशी आरोपींची नावे असून, यातील भुरूला पोलिसांनी अटक केली. अन्य आरोपी पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले.वेकोलि इंदर कॉलरी खाण क्रमांक - ६ परिसरात दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो. हा प्रकार पोलिसांना माहीत असूनही पोलीस जुगार खेळणाऱ्यावर कुठलीही ठोस कारवाई करीत नाही. दरम्यान, गुरुवारी रात्री या परिसरात जुगार सुरू होता. या जुगारातील रक्कम एक कोटीच्या आसपास असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्व आरोपी जुगार खेळण्यात मग्न असताना शीतलसिंह तिथे नाल (जुगार खेळणाऱ्यांकडून बळजबरीने पैसे वसूल करणे) वसूल करण्यासाठी गेला होता. परंतु, सर्व आरोपींनी त्याला नाल देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे शीतलसिंहची आरोपींसोबत सुरुवातीला बाचाबाची झाली. हा वाद विकोपास गेल्याने आरोपींनी लगेच तलवारी काढल्या. त्यामुळे शीतलसिंहने लगेच भाऊ सन्नीला मदतीसाठी घटनास्थळी बोलावून घेतले. आरोपींनी शीतलसिंहवर तलवारीने वार करून त्याच्या दिशेने देशीकट्ट्यातून गोळीबार केला.आरोपींचा शोध सुरूया प्रकरणातील पाच आरोपींपैकी एकास अटक करण्यात आली असून, चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती कन्हान पोलिसांनी दिली. या आरोपींच्या शोधात मध्य प्रदेशातील छिंदवाडा, शिवनी, उमेरिया तसेच नागपूर व भंडारा येथे पथके रवाना करण्यात आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. हा परिसर संवेदनशील असून, येथे गुन्हेगार देशीकट्टा व माऊझरचा खुलेआम वापर करतात. मृत शीतलसिंह हादेखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्यामुळे येथे गँगवार भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जुगाराच्या वादातून हत्या
By admin | Updated: October 25, 2014 02:36 IST