उमरेड : अळीचा हल्ला, निसर्गचक्राचा उलटा फास आणि कोरोना संकटाशी दोन हात करीत शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कसाबसा उमरेडच्या बाजार समिती यार्डात आणला. आठवडाभर व्यापारी फिरकलेच नाही. शेतमालाची बोलीही झाली नाही. कुठे शेडखाली तर कुठे शेडच्या बाहेर शेतमाल पडून राहिला. यादरम्यान अवकाळी पाऊस बरसला. काहींचा शेतमाल सडण्यास सुरुवात झाली तर काहींच्या शेतमालास कोंब फुटले. उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कधी नव्हे तो प्रकार बघावयास मिळाल्याने, या संपूर्ण कारभारावर शेतकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी नियोजनावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात सोयीसुविधा आणि उत्तम नियोजन यामुळे उमरेडच्या बाजार समितीचा लौकिक आहे. यामुळेच लांब अंतरावरूनही शेतकरी याठिकाणी शेतमाल आणतात. सध्या सोयाबीन, चणा आणि तूर मोठ्या प्रमाणावर तर गहू, तांदूळ आणि अन्य शेतमालाची किरकोळ प्रमाणात आवक सुरू आहे. आठवडाभरापासून हजारो पोत्यांची आवक याठिकाणी झाली. अशातच गुरुवार (दि.१८), शनिवार (दि.२०) आणि आज मंगळवारी अशी आठवड्यातील तीनदा होणारी बोली झालीच नाही.
यादरम्यान शेतमालाची आवक चांगलीच वाढली. बाजार समितीच्या विविध शेडखाली तर काही माल शेडच्या बाहेर ठेवण्यात आला. अशातच काही दिवसापासून अवकाळी पावसाने सळो की पळो करून सोडले. १९, २०, २१ आणि २३ मार्च रोजी पावसाच्या सरींनी हैराण केले. यामुळे अनेकांचा शेतमाल भिजला. शेतकऱ्यांनी वारंवार अडत्यांकडे विचारणा केली असता, पावसामुळे व्यापारीच शेतमालासाठी आले नसल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यातील हिवरा येथील रोशन खोंडे या शेतकऱ्याने १६ मार्च रोजी उमरेडच्या बाजार समितीमध्ये २८ पोती चणा आणला. पावसामुळे ६ पोती खराब झाली. कोंब फुटले. अन्य शेतमालाचेही हाल झाल्याची कैफियत मांडत शेतमाल परत आणणार होतो. वाहन मिळाले नाही. स्वत: प्लास्टिक विकत घेत शेतमाल दुसरीकडे झाकून ठेवल्याचे ते म्हणाले. हा निष्काळजणीपणा योग्य नसल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला.
-
असा झाला पाऊस
वादळवारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली. १९ मार्च रोजी ३.३८ मिलीमीटर तसेच २० ला १०.०८, २१ ला ४.६ तर २३ मार्च रोजी २.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाची उपरोक्त सरासरी ही तालुक्याची असून, शहरात २० मार्चला १५.२ तर २३ ला ९ मिलीमीटर पाऊस झाला. आजही दिवसभर पावसाची रिमझिम होती.
-
सततच्या अवकाळी पावसामुळे ही समस्या उद्भवली. आज तातडीने नि:शुल्क गोदामाची पर्यायी व्यवस्था करून दिली. याठिकाणी काहींनी शेतमाल हलविला. आज काही व्यापारी आले होते. गोदामातच वजनकाटा करू, अशी चर्चा सुरू असतानाच पावसाची सर आली.
रूपचंद कडू
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरेड